कोरोनाचं निमित्त साधत पाकिस्तानची भारतावर तिरपी चाल
आता म्हणे....
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने रविवारी Corona कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी म्हणून सार्क (SAARC) राष्ट्रांच्या प्रमुखांशी व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे संपर्क साधण्यात आला. ज्यामध्ये कोरोनाशी दोन हात करण्यासाठीची रणनिती आखण्यात आली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपत्कालीन निधीची व्यवस्था करण्याचा पर्याय सुचवला. भारताक़डून यासाठी १ कोटी युएस डॉलर इतका निधी देणार असल्याचंही त्यांनी यादरम्यान सांगितलं.
व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे घेण्यात आलेल्या या बैठकीत पाकिस्तानने मात्र तिरपी चाल चालली आणि पुन्हा एकदा जम्मू- काश्मीरचाच पाढा गिरवला. पाकिस्तनचे आरोग्य मंत्री जफर मिर्झा यांनी काश्मीर मुद्दा अधोरेखित करत त्या ठिकाणच्या नागरिकांवर लावण्यात आलेले निर्बंध हटवण्यात यावेत अशी मागणी त्यांनी केली.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यादरम्यान उपस्थित नसल्यामुळे त्यांच्याऐवजी मिर्झा यांनी या परिषदेला हजेरी लावत आपला पर्याय सर्वांपुढे मांडला. त्यांनी पंतप्रधान मोदींचे आभारही मानले.
मिर्झा यांनी याच परिषदेत जम्मू काश्मीर येथेही कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून आल्याचं म्हणत सावधगिरी म्हणून या भागात लावण्यात आलेले निर्बंध तातडीने हटवावेत अशी मागणी केली. दरम्यान, कोरोनाच्या दहशतीमध्येच पाकिस्तानने पुन्हा एकदा त्यांची चाल चालण्यास सुरुवात केल्याची प्रतिक्रिया काही स्तरांतून व्यक्त करण्यात आली.
भारताकडून यावर थेट शब्दांत उत्तर देण्यात आलं
'पाकिस्तानचे आरोग्यमंत्री या परिषदेत बोलतानाही संकोचले होते. ही आपमतलबी वागणूक झाली. मानवतेच्या या कामातही पाकिस्तानकडून राजकीय खेळी खेळली गेली. नेपाळचे पंतप्रधान एका दिवसापूर्वीच रुग्णालयातून परतले असतानाही ते या परिषदेत सहभागी झाले होते. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना वगळता सार्क राष्ट्रांच्या प्रत्येक प्रमुखाने यात सहभाग घेतला', अशा शब्दांत पाकिस्तानच्या वक्तव्यावर भारताकडून प्रतिक्रिया देण्यात आलं.