Pakistan ची पुन्हा नापाक हरकत, सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर
जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा दल अलर्टवर आहे.
श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा दल अलर्टवर आहे. त्यांना अशी माहिती मिळाली आहे की, पाकिस्तानने हिवाळा येण्याआधी जास्तीत जास्त दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत पाठवण्यासाठी नियंत्रण रेषेजवळ दहशतवादी लॉन्च पॅड बनवले आहेत. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात नेहमीच सीमेपलीकडून काश्मीर भागात अतिरेकी घुसखोरी करत असतात. पहिल्या बर्फवृष्टीनंतर हे पर्वत पूर्णपणे बर्फाने झाकलेले असतात. त्यामुळे दहशतवाद्यांना सीमे ओलांडून येणे कठीण असते. म्हणूनच हिवाळ्यापूर्वी, पाकिस्तान जास्तीत जास्त दहशतवादी पाठवण्याचा प्रयत्न करतो. दहशतवाद्यांच्या संभाषणाच्या इंटरसेप्टनुसार सीमेपलीकडे 6 हून अधिक लॉन्च पॅड सक्रिय झाले आहेत आणि सुमारे 150 प्रशिक्षित दहशतवादी घुसखोरीसाठी तयार आहेत. (High alert on Line of Control)
पाकिस्तानने (Pakistan) हे दहशतवादी लॉन्च पॅड पूर्वीच्या ठिकाणांहून हलवल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली आहे. हे लॉन्च पॅड नियंत्रण रेषेपासून किमान 4-5 किमी अंतरावर होते आणि आता ते नियंत्रण रेषेपासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर हलवण्यात आले आहेत. सुरक्षा दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कॅम्प गुरेझ, नीलम खोऱ्यातील भारतीय भागांच्या अगदी जवळ आहेत. जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेजवळ कील, तंगधर, उरी, चकोटी, गुलमर्ग, पूंछ, राजौरी, सुंदरबनी आणि नौशेरा सेक्टर लगत आहेत.
या सूचना मिळाल्यानंतर भारतीय लष्कराला हाय अलर्टवर ((Security forces in Jammu and Kashmir)) ठेवण्यात आले आहे. नियंत्रण रेषेवर पाळत वाढवण्यात आली आहे. ड्रोन, नाईट व्हिजिल कॅमेरे, पीटीझेड आणि थर्मल इमेजिंग कॅमेरे यांसारख्या अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीने भारतीय सैन्य रात्रंदिवस गस्त घालत आहे.
गुप्तचर संस्थांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने एलओसीजवळील बालाकोट, गडी हबीबुल्ला, चेलाबंदी, शौनाला, दुलाई, सांसा, कोटली, गुलपूर, फागोश आणि दुबली या भागात सक्रिय प्रशिक्षण शिबिरे हलवली आहेत. गेल्या दोन आठवड्यात सीमेपलीकडून दहशतवाद्यांनी घुसखोरीचे अनेक प्रयत्न केले आहेत.
एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेजवळील विविध ठिकाणी या प्रयत्नांमध्ये सुमारे 8 दहशतवादी मारले गेले. ड्रोनच्या मदतीने सीमेपलीकडून शेकडो रायफल, पिस्तूल आणि शस्त्रास्त्रे पाठवण्यात आल्याचेही अहवालात म्हटले आहे. सुरक्षा दलांनी खोऱ्यात 200 हून अधिक पिस्तुले जप्त केली आहेत, ज्यांचा वापर दहशतवादी गटांद्वारे नागरिकांच्या हत्येसाठी केला जात होता.
नियंत्रण रेषेचे रक्षण करणारे भारतीय लष्कराचे जवान दहशतवाद्यांना घुसखोरीची कोणतीही संधी देत नाहीत.