नवी दिल्ली - राजस्थानमधील अलवारमध्ये काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्या जाहीर सभेत काही जणांनी 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्याच्या वृत्तावरून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सिद्धू यांच्यावर जोरदार टीका केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट घ्याल, तर तुमच्या जाहीर सभांमध्ये अशाच घोषणा दिल्या जातील, या शब्दांत अमित शहा यांनी सिद्धू यांच्यावर टीका केली. राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीचा प्रचार बुधवारी संपला. त्या पार्श्वभूमीवर अमित शहा म्हणाले की, राहुल गांधी यांना विचारूनच नवज्योतसिंग सिद्धू यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांची गळाभेट घेतली होती का?


सिद्धू यांच्या पाकिस्तान प्रेमाबद्दल राहुल गांधी यांनी उत्तर दिले पाहिजे, असेही अमित शहा म्हणाले. सिद्धू यांनी एक डिसेंबरला अलवारमध्ये घेतलेल्या जाहीर सभेवेळी काही लोकांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. याचे वृत्त 'झी न्यूज'ने प्रसारित केले होते. त्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी हे प्रश्न उपस्थित केले. 


काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी सिद्धू यांच्या जाहीर सभेत पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या नसल्याचे म्हटले होते. यावेळी लोकांनी 'सत श्री अकाल' अशा घोषणा दिल्या होत्या, असे त्यांनी सांगितले होते. खुद्द नवज्योतसिंग सिद्धू यांनी 'झी न्यूज' विरोधात बदनामीचा खटला दाखल करण्याचा इशारा दिला. या सर्व पार्श्वभूमीवर, 'झी न्यूज'ने संबंधित वृत्त प्रसारित केल्यानंतर अलवारमधील काही प्रत्यक्षदर्शी आणि सिद्धू यांच्या जाहीर सभेला उपस्थित असलेल्या पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी एका पत्रकाराने थेट घडलेली घटना तंतोतंत खरी असल्याचे 'झी न्यूज'च्या कॅमेऱ्यापुढे सांगितले. सिद्धू जाहीर सभेमध्ये बोलत असताना काही जणांनी 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या होत्या, असे सांगत त्याने काँग्रेसचा पर्दाफाश केला.