16 वर्षानंतर पाकिस्तानी कैद्याची सुटका, सोबत घेऊन गेला श्रीमद्भगवत गीता
पाकिस्तानी कैद्याची अनोखी कथा
नवी दिल्ली : भगवान श्रीकृष्णांच्या जन्मस्थानी जेलमध्ये अनेक वर्ष शिक्षा भोगल्यानंतर पाकिस्तानचा कैदी जलालुद्दीनचं मन देखील बदललं. हेरगिरीच्या आरोपाखाली 16 वर्ष शिक्षा भोगल्यानंतर रविवार त्याची सूटका करण्यात आली. यानंतर त्याला पुन्हा आपल्या देशात पाठवण्याची प्रक्रिया सुरु झाली तेव्हा त्याने आपल्यासोबत श्रीमद्भगवदगीता नेण्याची इच्छा दर्शवली. जेल अधिकाऱ्यांनी देखील त्याची ही इच्छा पूर्ण केली. जलालुद्दीन गीता घेऊन दिल्ली येथून आलेली स्पेशल टीमसोबत वाराणसी येथून अमृतसरसाठी रवाना झाला. सोमवारी वाघा बॉर्डरवर त्याला आपल्या देशात पाठवलं जाणार आहे.
वाराणसीच्या कँटोनमेंट भागात एअरफोर्स कार्यालयाजवळ 16 वर्षापू्र्वी पाकिस्तानी जलालुद्दीनला हेरगिरी करताना अटक केली होती. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात राहणाऱ्या जलालुद्दीनकडे लष्कराशी संबंधित कागदपत्र आणि लष्कराच्या कॅम्पचा नकाशा सापडला होता. तेव्हापासून तो शिवपूर सेंट्रल जेलमध्ये बंद होता. पण जेलमध्ये त्याचं संपूर्ण आयुष्यच बदललं.
जलालुद्दीनने जेलमध्ये श्रीमद्भगवदगीतेचा अभ्यास सुरु केला. जेलमध्येच त्याने बीए आणि एमए पूर्ण केलं. सोबतच इलेक्ट्रीशनचा कोर्स देखील केला. शिवपूर सेंट्रल जेलचे वरिष्ठ अधीक्षक अंबरीश गौड यांनी म्हटलं की, शिक्षा भोगत असताना जलालुद्दीनच्या विचारात बदल झाला. हे त्याचच उदाहरण आहे की तो जेव्हा त्याच्या देशात परत जातोय तेव्हा तो गीता सोबत घेऊन चालला आहे.
जलालुद्दीनने रविवारी सुटका झाल्य़ानंतर जेल अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गृह मंत्रालयाला एक पत्र देखील पाठवलं. पत्रात त्याने लिहिलं की, 'माझी इच्छा आहे की, यूएसए, यूके, यूएई प्रमाणे सार्क देशांनी ही एलओसी संपवली पाहिेजे. आपण सगळे एक आहोत. आपण एक झालो तर कोणतेच देश आपल्यावर डोळेवर करुन पाहण्याची हिंम्मत करणार नाहीत.'
जलालुद्दीनने पत्रात म्हटलं की, '16 वर्ष हिंदुस्तानाच्या जेलमध्ये राहिल्यानंतर असं कधी वाटलंच नाही की दुसऱ्या देशात राहत आहे. काही लोकांनी दोन्ही देशाला वेगळं केलं पण हृदय वेगळं नाही करु शकले. जेलमध्ये मिळालेलं प्रेम आणि आधार यामुळे घराची कधी आठवण नाही आली. ईद आणि दिवाळी सगळे मिळून एकत्र साजरा करुयात'
जलालुद्दीनला 2003 मध्ये स्थानिक कोर्टाने वेगवेगळ्या प्रकरणात 33 वर्षाची शिक्षा सुनावली होती. नंतर हायकोर्टामध्ये अपील केल्यानंतर त्याची शिक्षा 16 वर्ष करण्यात आली. 2017 मध्ये कोर्टाने 16 वर्ष शिक्षा पूर्ण झाल्य़ानंतर जलालुद्दीनची सूटका करण्याचे आदेश दिले. पण गृह मंत्रालयाच्या परवानगीसाठी 1 वर्ष गेला आणि संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता त्याला वाघा बॉर्डरवरुन पाकिस्तानात पाठवलं जाणार आहे