जयपूर: जयपूरच्या मुख्य कारागृहात बुधवारी एका पाकिस्तानी कैद्याला अज्ञात टोळक्याकडून मारहाण झाल्याची घटना घडली. या मारहाणीत शकरुल्लाह या पाकिस्तानी कैद्याचा मृत्यू झाल्याचे समजते. शकरुल्लाह हा सियालकोट येथील रहिवासी होता. दहशतवादी कारवायांच्या आरोपाखाली २०१७ साली त्याला अटक करण्यात आली होती. यामध्ये दोषी ठरल्यानंतर शकरुल्लाह याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी जयपूर कारागृहात धाव घेतली. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारहाणीदरम्यान शकरुल्लाह याच्या डोक्याला जबर इजा झाली. त्याच्या डोक्यावर जड वस्तूने प्रहार करण्यात आल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.



तुरुंग प्रशासनाने शकरुल्लाहचा मृतदेह तातडीने सवाई मानसिंग सरकारी रुग्णालयात नेला. याठिकाणी मृतदेहाचे शवविच्छेदन होणार आहे. तर दुसरीकडे फॉरेन्सिक पथकातील कर्मचारी घटनास्थळी पुरावे शोधण्यासाठी गेल्याचेही समजते.