मुंबई : भारत हा विविधतेनं नटलेला एक देश आहे. पर्यटकांसाठी तर भारतमामध्ये परवणी असणारी अशी अनेक ठिकाणं आहेत जी पाहताना आपण काहीतरी अविश्वसनीय पाहतोय याचीच अनुभूती होते. आश्चर्यानं थक्क करणाऱ्या अशाच काही ठिकाणांपैकी एक म्हणजे लडाखमधील निस्सिम सौंदर्यानं मढलेला पँगाँग त्सो लेक. (Leh Ladakh jammu kashmir)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्षभरामध्ये असंख्य पर्यटक या ठिकाणाला भेट देताना दिसतात. पण, सध्या हे ठिकाण एका वेगळ्या कारणामुळं चर्चेत आलं आहे. हे कारण म्हणजे व्हायरल होणारा एक व्हिडीओ. 


या व्हिडीओमध्ये काही अतिउत्साही मंडळी त्यांची SUV कार या लेकमध्ये रेटताना दिसत आहेत.


इतकंच नव्हे, तर त्या लेकच्या किनाऱ्यावर एका टेबलावर दारुच्या बाटल्यासुद्धा ठेवल्याचं पाहायला मिळत आहे. 


पर्यटक म्हणून कोणत्याही ठिकाणी गेलं असता तिथं जबाबदारीनं वागलं पाहिजे असं आपल्याला कायम सांगितलं जातं. पण, ही काही मंडळी त्यांचा जबाबदारपणा या अशा आक्रस्ताळ मार्गानं दाखवतात आणि त्यांना नेमकं काय म्हणावं हाच प्रश्न पडतो. 


Jigmat Ladakhi या ट्विटर अकाऊंटवरून लडाखचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.


व्हिडीओ अतिशय लज्जास्पद असल्याचं म्हणत कशा प्रकारे पर्यटक लडाखच्या सौंदर्याला हानी पोहोचवत आहेत याबद्दलचा संताप त्यानं ट्विट करत व्यक्त केला. 


लडाख म्हणजे तीनशेहून जास्त पक्ष्यांच्या प्रजातींचा अधिवास आहे. शिवाय अनेक पक्ष्यांची घरटी या भागात आहेत असं सांगत त्यानं महत्त्वाच्या मुद्द्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं. 


आपला उत्साह निसर्गाला हानी पोहोचवण्यासोबत पुढच्या पिढीसाठीही बऱ्याच गोष्टी उध्वस्त करत असल्याचा नाराजीचा तीव्र सूर त्यानं या ट्विटमध्ये आळवला. 



व्हिडीओ पाहिल्यानंतर हरियाणा, पंजाब, दिल्ली, चंदीगढ या भागांतून येणाऱ्या वाहनांनी इथं हा उच्छाद मांडला असल्याचं सांगितलं.



काही नेटकऱ्यांनी तर कारचा नंबर स्पष्ट दिसत असल्यामुळं आता या कारवर आणि चालक, मालकावर कारवाई करण्याचीही मागणी केली आहे.