नवी दिल्ली: पंकजा मुंडे यांना भविष्यात नक्की न्याय मिळेल, असे सूचक वक्तव्य विधानसभा अध्यक्ष आणि काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केले आहे. ते मंगळवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, पंकजा मुंडे यांची फेसबुक पोस्ट पाहता भाजपमध्ये त्यांचं चांगलं चाललंय असे वाटत नाही. भाजपमध्ये ओबीसी नेत्यांवर अन्याय केला जातोय. पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्याही त्याच भावना आहेत. त्यामुळे पंकजा यांची मुस्कटदाबी होता कामा नये. त्यांना भविष्यात न्याय मिळेल पण कुठे मिळणार, हे अद्याप मी सांगू शकत नाही, असे नाना पटोले यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपला सोडचिठ्ठी देणार का?, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन


दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या नाराजीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी विनोद तावडे आणि राम शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. यानंतर पंकजा यांनी प्रसारमाध्यमांशी संवादही साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, मी भाजपची प्रामाणिक कार्यकर्ती आहे. त्यामुळे सध्या माझ्याविरुद्ध होत असलेल्या आरोपांमुळे मी व्यथित झाली आहे. १२ डिसेंबरला मी या सगळ्यावर बोलेन, असे पंकजा यांनी सांगितले. 


भाजपच्या अपक्ष बंडखोरांची डावलेल्या नेत्यांना साद


मात्र, गेल्या काही दिवसांतील पंकजा यांचा एकूण नूर पाहता त्या वेगळी राजकीय वाट निवडतील, अशी शक्यता आहे. सुरुवातीला त्यांनी फेसबुक पोस्टवरून आपल्या समर्थकांना १२ डिसेंबरला गोपीनाथ गडावर येण्याचे आव्हान केले. यानंतर त्यांनी स्वत:च्या ट्विटर अकाऊंटवरून भाजपचा उल्लेखही हटवला होता. त्यामुळे पंकजा मुंडे शिवसेनेत प्रवेश करू शकतात किंवा स्वत:चा पक्ष स्थापन करतील, या चर्चेने राजकीय वर्तुळात जोर धरला आहे.