भाजपला सोडचिठ्ठी देणार का?, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन

 पंकजा मुंडे यांनी मौन सोडत स्पष्टीकरण दिले आहे.

भाजपला सोडचिठ्ठी देणार का?, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन

मुंबई : पंकजा मुंडे (Pankaja Munde ) यांनी समाजमाध्यमांवर एक पोस्ट केली आणि चर्चा सुरु झाली. पंकजा नाराज आहेत. त्या पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. त्यानंतर भाजप (BJP) नेत्यांकडून तात्काळ स्पष्टीकरण देण्यात आले. त्या असे काहीही करणार नाहीत. प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले. दरम्यान, त्यांच्या पोस्टला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रिपोस्ट केल्यानंतर चर्चा अधिक रंगली. आज तर विनोद तावडे आणि राम शिंदे या माजी मंत्र्यांनी त्यांची भेट घेतली. त्यामुळे नाराज पंकजा या पक्ष सोडणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली. मात्र, या चर्चेला पंकजा यांनी पुर्नविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. मी नाराज आहे. माझ्यावर जे आरोप झाले आहेत, त्यामुळे मी अधिक व्यथित झाले आहे. मी १२ तारखेला गडावर बोलणार आहे, असे पंकजा मुंडे यांनी मौन सोडत स्पष्टीकरण दिले आहे.

माजी ग्रामविकास मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. पंकजा मुंडे यांनी समाधमाध्यमावरुन भाजप हे हटविले. त्यामुळे पक्षावर नाराज असल्याने त्या पक्ष सोडणार असल्याचे बोलले जात होते. आता या संपूर्ण विषयावर स्वत: पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मी पक्ष सोडणार या निव्वळ अफवा आहेत. माझ्या पोस्टचा विपर्यास केला गेला. मी खूप व्यथित आहे. मी पद मिळवण्यासाठी दबाव निर्माण करत आहे, हा आरोपही संपूर्णपणे चुकीचा आहे, असे त्या म्हणाल्यात.  

मी पक्षाची प्रामाणिक कार्यकर्ती आहे. मी पक्षासाठी काम केले आहे. माझ्यावरील आरोपांमुळे मी दु:खी झाले आहे. मी १२ डिसेंबरला बोलणार आहे. मी आता अधिक काही बोलणार नाही. मला आत्मचिंतनासाठी आणि स्वतःशी बोलण्यासाठी वेळ हवा आहे. तो वेळ मला दिला पाहिजे. मी ती पोस्ट आता केली आणि आत्ताच त्यावर बोलणे, भाष्य करणे मला शक्य नाही, असे पंकजा म्हणाल्यात. मी दरवर्षी गोपीनाथ गडावर मोठा कार्यक्रम घेते. माझ्या पोस्टवर सुरुवातीला सर्वच चॅनलने व्यवस्थित बातमी दिली. मात्र, एक दोन वर्तमानपत्रांनी पंकजा मुंडे पक्ष सोडणार, अशी बातमी केली. यानंतर या सर्व चर्चेला वेगळा सूर आला आणि वेगळ्या पद्धतीने हाताळणी सुरु आहे. त्यामुळे मी खरंच खूप दुःखी आणि व्यथित आहे, असे त्या म्हणाल्यात.