Pappu Yadav Threat: पूर्णियाचे लोकसभेचे खासदार पप्पू यादव यांना पुन्हा एकदा बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. व्हॉट्सअॅपवर ही धमकी त्यांना देण्यात आली आहे. पाकिस्तानी नंबरवरुन धमकी देण्यात आली असून धमकी देणारा बिश्नोईच्या जवळचा व्यक्ती असल्याचे सांगण्यात आले आहे. 2 ते 3 दिवसांत तुमची हत्या करण्यात येईल, अशी धमकी पप्पू यादव यांना देण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हॉटसअॅपवर एक धमकीचा व्हिडिओ टाकण्यात आला आहे. तर त्याखालील मेसेजमध्ये युअर फ्युचर असं लिहण्यात आलं आहे. त्या व्यतिरिक्त पप्पू यादव यांना फोन करुनही धमकी देण्यात आली. 24 डिसेंबरच्या आधी पप्पू यादवला ठार मारू, असं ही त्यात लिहण्यात आलं आहे. 24 डिसेंबर रोजी पप्पू यादव यांचा वाढदिवस आहे. त्याचबरोबर धमकी देणाऱ्याने व्हॉट्सअॅपवर पप्पू यादव आणि त्याचा मुलगा सार्थकचा फोटो टाकून दोघांवरही नजर आहे, असं लिहलं होतं. मात्र, या धमकीनंतरही पप्पू यादव यांनी धमकी देणाऱ्याला आव्हान दिलं आहे. तारीख आणि मैदान ठरवं, असं त्यांनी म्हटलं आहे. 


दरम्यान, या आधीही पूर्णियाचे खासदार पप्पू यादवला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी मिळाली होती. त्यांच्या कार्यालयात धमकीचे फोन आणि मेसेज आले होते. पप्पू यादव यांच्या पी.एला 6 नोव्हेंबर रोजी रात्री 2 वाजता आणि 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास फोन आले होते. या प्रकरणी त्यांच्या PAने सांगितले की खासदार यादव यांना व्हॉट्सअॅपवर धमकी देण्यात आली होती. त्यांनी व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रीनशॉटदेखील शेअर केला होता. 


काय आहे संपूर्ण प्रकरण?


काही दिवसांपूर्वी पप्पू यादवने लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सलमान खानला मिळणाऱ्या धमक्यांबाबत एक पोस्ट केली होती. पोस्टमध्ये यादव यांनी लॉरेन्स गँगला आव्हान देत 24 तासांत त्यांचे नेटवर्क संपवण्याबद्दल धमकी दिली होती. त्यानंतर काहीच दिवसांत त्यांना एक कथित फोन आला होता. या फोनमधून त्यांना धमकी देण्यात आली होती. या धमकीनंतर त्यांना केंद्राकडून सुरक्षा वाढवण्याची मागणी केली होती. पप्पू यादव यांना सध्या Y श्रेणीची सुरक्षा मिळाली आहे. मात्र आता त्यांना Z श्रेणीची सुरक्षा देण्यात येते.