Parliament Breach: घुसखोरी नव्हे तर स्वत:ला पेटवून द्यायचा होता प्लान, सागर शर्माचा मोठा खुलासा
Parliament Security Breach: संसदेत घुसखोरी कऱणाऱ्या सागर शर्माने मोठा खुलासा केला आहे. धुराचा कट नंतर आखण्यात आला होता, आधी संसदेबाहेर स्वत:ला पेटवून देण्याचा प्लान होता अशी धक्कादायक माहिती त्याने दिली आहे.
लोकसभेत घुसखोरी करत संसदेच्या सुरक्षेतील त्रुटी उघड करणाऱ्या सर्व आरोपींभोवती फास आवळला जात आहे. पोलिसांनी आतापर्यंत 7 आरोपींना अटक केली आहे. या संपूर्ण घटनेचा मास्टमाइंड असणाऱ्या ललित झा यालादेखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सध्या तो 7 दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे. पोलिसांनी ललितला 14 डिसेंबरच्या रात्री अटक केली. पोलिसांनी 48 तास केलेल्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. ज्याच्या आधारे पोलिसांसमोर अनेक गोष्टींचा उलगडा झाला आहे. दरम्यान, आरोपींपैकी एक असणाऱ्या सागर शर्माने संसदेबाहेर स्वत:ला पेटवून देण्याची योजना होती, मात्र नंतर ती रद्द करण्यात आली अशी माहिती दिली आहे.
एकूण 7 धुराच्या नळकांड्या घेऊन संसदेत पोहोचले होते
दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी एक-दोन नव्हे तर एकूण 7 धुराच्या नळकांड्या घेऊन पोहोचले होते. या घटनेला मोठं रुप देण्याच्या हेतूनेच संसदेत घुसण्याचा कट आखण्यात आला होता. आरोपींना गुगल सर्च करत संसद भवनाजवळ असणाऱ्या परिसराची छाननी केली होती. याशिवाय त्यांनी संसेदच्या सुरक्षेचे जुने व्हिडीओ पाहिले होते.
संसदेत गोंधळ का घातला?
पोलिसांच्या हाती लागू नये यासाठी त्यांनी सुरक्षित संवाद कसा साधावा याचाही गुगलवर शोध घेतला होता. यामुळेच ते सिग्नल अॅपवर बोलत होते, जेणेकरुन आपल्यापर्यंत कोणी पोहोचू नये. आतापर्यंतच्या तपासात ललित झा मास्टरमाइंड असल्याचं स्पष्ट होत आहे. मीडियात आपला प्रभाव निर्माण करण्याचा त्याचा हेतू होता. यामुळेच त्याने अधिवेशनादरम्यान संसदेत घुसण्याची योजना आखली होती.
स्वत:ला आग लावण्याची योजना केली रद्द
चौकशीदरम्यान आरोपी सागरने मोठा खुलासा करत सांगितलं आहे की, आधी स्वत:ला पेटवून देण्याची योजना आखण्यात आली होती. पण नंतर ही योजना रद्द करण्यात आली. सागरने विशेष पथकाला असंही सांगितलं की, एक जेलसारखा पदार्थ ऑनलाइन खरेदी करण्याचा विचारही करण्यात आला होता, जो शरिरावर लावल्यानंतर आगीपासून वाचवलं जाऊ शकत होतं. पण ऑनलाइन पेमेंट होत नसल्याने ते जेल खरेदी करता आलं नाही आणि स्वत:ला आग लावण्याची योजना रद्द करण्यात आली.
पोलिसांना सापडले जळालेले मोबाईल
ललितने आई-वडिलांना दरभंगा ट्रेनमध्ये बसवल्यानंतर दिल्लीसाठी रवाना झाला होता. ललितच्या आई-वडिलांनी आमचा मुलगा निर्दोष असल्याचं म्हटलं आहे. त्याला न्याय देण्यासाठी कोर्टात धाव घेणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.
दरम्यान ललितने सर्व आरोपींचे मोबाईल जाळले होते. पोलिसांना घटनास्थळी जाऊन सर्व मोबाईल जप्त केले आहेत. या मोबाईलचे अवशेष एफएसएल तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
आरोपींनी घटनेपूर्वी संसदेची रेकी केल्याची कबुली मास्टरमाइंड ललितने पोलिसांना दिली. संसदेच्या सुरक्षेतील कोणत्याही त्रुटीचा फायदा घेऊन कट रचता यावा म्हणून आरोपींनी रेकीसाठी अनेकवेळा दिल्लीला भेट दिली. ललितने आपल्या सहआरोपींचे फोन नष्ट केल्याची कबुली दिली आहे जेणेकरून संसद घोटाळ्यातील कटाशी संबंधित सर्व पुरावे खोडून काढता येतील.