Parliament Security Breach Secret Diary: संसदेची सुरक्षा भेदल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी सागर शर्माच्या लखनऊमधील घरामध्ये पोलिसांनी सीक्रेट डायरी सापडली आहे. या डायरीमुळे अनेक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या डायरीमध्ये सागरने, "घराचा निरोप घेण्याची वेळ आली आहे," असं लिहिलं आहे. यामध्ये त्याने एकीकडे भिती वाटतेय तर दुसरीकडे काहीतरी करुन दाखवण्याची आग शांत बसू देत नाही, असंही नमूद केलं आहे.


डायरीत काय लिहिलं आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सागरने डायरीमध्ये, "घराचा निरोप घेण्याचा वेळ जवळ आला आहे. एकीकडे भीती वाटतेय तर दुसरीकडे काहीही करुन दाखवण्याची आग भडकत आहे. मला माझ्या आई-वडिलांना माझी स्थिती समजावता आली असती तर बरं झालं असतं. मात्र संघर्षाचा हा मार्ग निवडणं माझ्यासाठी फार सोपं नव्हतं. प्रत्येक वेळेस नवीन उमेद वाटतेय. 5 वर्ष मी वाट पाहिली आहे की, एक दिवस असा येईल जेव्ही मी माझ्या कर्तव्याच्या दिशेने पाऊल टाकेल. खेचून घेणं ज्याला जमतं ती व्यक्ती शक्तीशाली असते असं नाही. खरी शक्तीशाली व्यक्ती ती असते जिच्याकडे सुखाचा त्याग करण्याची क्षमता असते," असं लिहिलेलं आहे.


मुख्य सूत्रधार अटकेत


लोकसभेच्या 13 डिसेंबरच्या कामकाजादरम्यान थेट मुख्य सभागृहामध्ये झालेल्या घुसखोरीप्रकरणातील प्रमुख सूत्रधार ललित झा याने आत्मसमर्पण केलं आहे. गुरुवारी रात्री (14 डिसेंबर रोजी) ललित झा दिल्ली पोलिसांना शरण आला. लोकसभेत आणि संसदेच्या बाहेर काही तरुण तरूणींनी धुराच्या नळकांड्या फोडल्यानंतर एकच गोंधळ उडाला होता. गोंधळ घालण्याचा हा कट ललित झाच्या नेतृत्वाखाली रचण्यात आला होता. या गोंधळानंतर ललित झा फरार झाला होता. मागील 2 दिवसांपासून पोलीस ललित झाच्या मागावर होते अखेर त्याने आत्मसमर्पण केलं आहे. हा संपूर्ण कट त्या ललितच्या नेतृत्वाखाली रचला गेला असून तो सुद्धा पोलिसांच्या ताब्यात असल्याने तपासाला गती मिळणार आहे. 13 डिसेंबर रोजी संसदेत गदारोळ निर्माण करण्याची मूळ कल्पना ललित झाचीच होती. ललित झानेच या सर्वांना गोंधळ घालण्यासाठी प्रवृत्त केलं आणि प्रोत्साहन दिल्याची माहिती समोर आली आहे. संसदेच्या आवारात धूराच्या नळकांड्या फोडल्याचा व्हिडीओही ललित झानं बनवला होता. व्हिडीओ  शूट केल्यानंतर तो सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर ललित घटनास्थळावरुन फरार झाला होता.


पोलीस कोठडी


तापर्यंत अमोल शिंदे, नीलम आजाद, सागर शर्मा, मनोरंजन डी यांच्यासह आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. संसदेत घुसखोरी करणाऱ्या 4 आरोपींना 7 दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं आहे. पोलिसांनी या आरोपींची 15 दिवसांची रिमांड द्यावी अशी मागणी केली होती. कोर्टाने 7 दिवसांच्या कोठडीला मंजूरी दिली. गरज वाटल्यास कोठडीत वाढ करण्यात येईल असं कोर्टाने सांगितलंय.