संसदेच्या विशेष अधिवेशनात काय होणार? मोदी सरकारकडून खुलासा; मांडणार `ही` 4 विधेयके
Parliament Special Session Agenda: केंद्र सरकारने 18 ते 22 सप्टेंबरदरम्यान संसदेच्या विशेष सत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. या विशेष सत्रामध्ये नेमकं काय होणार आहे याची माहिती केंद्रातील मोदी सरकारने दिली आहे.
Parliament Special Session Agenda: केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने 18 ते 22 सप्टेंबरदरम्यान आयोजित केलेल्या विशेष अधिवेशनासंदर्भात बुधवारी रात्री मोठी घोषणा केली. या अधिवेशनामध्ये नेमकं काय होणार आहे यासंदर्भातील माहिती सरकारने दिली आहे. अधिवेशनाची कार्यक्रमपत्रिका सरकारने जाहीर केली आहे. केंद्रीय मुख्य निवडणूक आय़ुक्तांच्या नियुक्तीसंदर्भातील विधेयक वगळता अन्य वादग्रस्त विधेयके या अधिवेशना मांडली जाणार नसल्याचं यावरुन स्पष्ट झालं आहे. या विशेष अधिवेशनात मागील 75 वर्षांमध्ये देशाच्या संसदेची वाटचाल कशी झाली यावर चर्चा केली जाणार आहे. तसेच एकूण 4 विधेयकंही या अधिवेशनात मांडली जाणार आहेत. मात्र या यादीमध्ये अन्य काही विधेयकांचा नंतर समावेश केला जाईल असं म्हटलं जात आहे. गणेश चतुर्थीला लोकसभा व राज्यसभा नव्या इमारतीमध्ये स्थलांतरिक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या 4 विधेयकांवर होणार चर्चा
समोर आलेल्या माहितीनुसार, यामध्ये अधिवक्ता (दुरुस्ती) विधेयक 2023, नियतकालिकांच्या प्रेस व नोंदणी विधेयक, 2023 लोकसभेमध्ये मांडलं जाणार आहे. ही दोन्ही विधेयकं 3 ऑगस्ट रोजी राज्यसभेमध्ये संमत झाली आहेत. तसेच पोस्ट ऑफिस विधेयक 2023 आणि केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त तसेच इतर निवडणूक आयुक्त (नियुक्ती, सेवा आणि अटी तसेच कार्यालयीन कार्यकाळ) विधेयक, 2023 या दोन विधेयकांवर राज्यसभेमध्ये चर्चा होईल. ही दोन्ही विधेयकं 10 ऑगस्ट रोजी राज्यसभेमध्ये सादर करण्यात आली होती.
चांद्रयान-3 आणि जी-20 शिखर परिषदेचाही समावेश
संसदीय बुलेटिननुसार, "संसदेच्या विशेष सत्राच्या पहिल्या दिवशी 18 सप्टेंबर रोजी राज्यसभेमध्ये 'संविधान सभेपासून 75 वर्षांत संसदेचा प्रवास, काय साध्य केलं. अनुभव, आठवणी आणि शिकवण' यावर चर्चा होईल. त्याचबरोबर स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्सवावरही चर्चा केली जाणार आहे. तसेच चांद्रयान-3 आणि जी-20 शिखर परिषदेबद्दलचे प्रस्तावही मांडले जातील."
कसं होणार कामकाज
लोकसभा आणि राज्यसभेच्या सचिवालयांनी आपल्या बुलेटिनमध्ये संसदेचं विशेष सत्र 18 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. सरकारचं कामकाज पाहता हे सत्र 22 सप्टेंबरपर्यंत असेल. या सत्राच्या कार्यकाळामध्ये सामान्यपणे सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत आणि दुपारी 2 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत कामकाज चालेल. सचिवायलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विशेष सत्रामध्ये दोन्ही सभागृहांमध्ये प्रश्नोत्तरांचा कालावधी नसेल. तसेच बिगर-सरकारी कामाकाज होणार नाही.
17 ला विशेष बैठक
18 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या संसदेच्या 5 दिवसांच्या विशेष सत्राआधी 17 सप्टेंबर रोजी एक सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली आहे. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली. 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता ही बैठक बोलावण्यात आली आहे. ईमेलवरुन सर्व नेत्यांना आमंत्रणं पाठवण्यात आली आहेत.