Winter Session of Parliament 2021 : विरोधकांच्या गदारोळात  लोकसभे पाठोपाट राज्यसभेतही कृषी कायदे मागे घेण्याचं विधेयक आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आलं. याआधी सकाळी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लोकसभेत कृषी कायदे निरसन विधेयक 2021 सादर केलं आणि काही वेळातच ते मंजूर झाले. त्याचवेळी विरोधकांच्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
कृषी कायदा मागे घेण्याचे विधेयक दोन्ही सभागृहांनी मंजूर झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, यापूर्वी आम्ही सरकारला कृषीविषयक कायदे मागे घ्यावे लागतील असं सांगितले होतं. आज हे कायदे रद्द करण्यात आले. पण कृषीविषयक कायदे चर्चेविना रद्द करण्यात आले, हे दुर्दैव आहे. हे सरकार चर्चा करायला घाबरतं, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.


दरम्यान, विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. 


काँग्रेसचा आरोप
सभागृहाचे कामकाज होऊ न दिल्याबद्दल सरकार आमच्यावर आरोप करत असल्याचं काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी  म्हटलं आहे. पण कृषी कायदे मागे  घेण्याचं विधेयक चर्चेविनाच मंजूर करण्यात आलं. सरकारने कृषीविषयक कायदे रद्द केले असले तरी त्याची 'मन की बात' काही औरच आहे, असा आरोप अधीर रंजन चौधरी यांनी केला आहे. राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनीही विधेयकावर चर्चा व्हावी अशी आमची इच्छा होती असं म्हटलं आहे. तसंच घाईघाईत हे विधेयक मंजूर करुन मोदी सरकारला आपण शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याचं दाखवायचं आहे, अशी टीका मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली.