नवी दिल्ली : रेल्वे स्टेशनच्या तिकीट खिडकीवर असलेल्या रांगेमुळे अनेकवेळा प्रवाशांची गाडी चुकते तर काही जण या कारणामुळे विनातिकीट प्रवास करतात. विनातिकीट प्रवास करताना प्रवाशांना दंडही भरावा लागतो. पण या दंडापासून वाचण्याची संधी आता रेल्वे प्रवाशांना देणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रवासी घाईमध्ये असेल तर प्रवासादरम्यानही तिकीट काढता येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. रेल्वेच्या या नियमांमुळे प्रवासी विनातिकीट प्रवास करण्याची कारणं देऊ शकत नाही.


कसं मिळणार ट्रेनमध्ये तिकीट


ट्रेनमध्ये हे तिकीट घेण्यासाठी प्रवाशाला इंटरनेट किंवा ऍपची गरज नाही. तर ट्रेनमध्ये असलेल्या टीसीकडे जाऊन तिकीट घ्यावं लागणार आहे. टीसीकडे जाऊन तुम्हाला तिकीट नसल्याचं सांगावं लागेल. यानंतर टीसी तुमच्याकडून तिकीटाचे पैसे आणि १० रुपये अधिकचे घेऊन तुम्हाला तिकीट देईल.


ट्रेनमध्येच मिळणार आरक्षित तिकीट


याचबरोबर सुपरफास्ट ट्रेनमध्ये आरक्षित तिकीट देण्याची सुविधा सुरु करण्यात आली आहे. थोड्याच दिवसांमध्ये ही सुविधा दुसऱ्या ट्रेनमध्येही सुरु होईल. तिकीट आणि आरक्षणासाठी टीसीकडे मशीन देण्यात आलं आहे. या मशीनमधून टीसी प्रवाशांना तिकीट आणि आरक्षण देईल.