गुजरातच्या भावनगरमध्ये रुग्णाच्या कुटुंबाने डॉक्टरला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, डॉक्टरने एमर्जन्सी रुममध्ये येण्याआधी नातेवाईकांना चप्पल काढायला सांगितल्याने त्यांनी मारहाण केली. शनिवारी भावनगरच्या सिल्होरमधील खासगी रुग्णालयात हा प्रकार घडला. आरोपी महिलेला घेऊन रुग्णालयात उपचारासाठी पोहोचला होता. महिलेच्या डोक्याला इजा झाली होती. पण यावेळी क्षुल्लक कारणावरुन त्यांनी डॉक्टरांशी वाद घातला. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. इमर्जन्सी रुममध्ये काहीजण महिला बेडवर झोपली असताना तिथे उभे असल्याचं दिसत आहे. काही सेकंदानी डॉक्टर जयदीपसिंह गोहील तिथे पोहोचतात. यावेळी ते रुममध्ये हजर नातेवाईकांना चप्पल बाहेर काढण्यास सांगतात. 


यानंतर नातेवाईक त्यांच्याशी वाद घालतात आणि डॉक्टरला मारहाण सुरु करतात. महिला बेडवर असताना आरोपी डॉक्टरला बेदम मारहाण करत असतात. यादरम्यान तिथे उभे नर्सिंग स्टाफ मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतात. या भांडणात तिथे ठेवण्यात आलेली सामग्री आणि औषधं यांचंही नुकसान होतं. 



एका अधिकाऱ्याने सांगितलं की, आरोपी हिरेन डांगर, भवदीप डांगर आणि कौशिक कुवाडिया यांना कलम 115 (2) (कोणत्याही व्यक्तीला दुखापत करण्याच्या हेतूने कृत्य करणे), 352 (शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान), 351 (3) (गुन्हेगारी धमकी ), आणि भारतीय न्याय संहिता (BNS) च्या इतर संबंधित तरतुदींनुसार अटक करण्यात आली आहे. 


गेल्या महिन्यात कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका निवासी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येवरून देशभरात खळबळ उडाली असताना हा हल्ला झाला आहे. यामुळे पुन्हा एकदा डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.