तारिक अन्वर यांच्या राजीनाम्यावर सुप्रिया सुळेंनी दिली `ही` प्रतिक्रिया
कुणीतरी वावड्या उठवल्यामुळे तारिक अन्वर यांनी पक्षाचा राजीनामा दिला
नवी दिल्ली: राफेल कराराबाबत शरद पवारांनी पंतप्रधान मोदींची पाठराखण वक्तव्य केल्यामुळे शुक्रवारी पक्षाचे ज्येष्ठ नेते तारिक अन्वर यांनी पक्षाच्या सदस्यत्वासह खासदारकीचाही राजीनामा दिला होता. या पार्श्वभूमीवर बोलताना राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी तारिक अन्वर यांनी घाईघाईने घेतलेल्या या निर्णयाबद्दल खंत व्यक्त केली. राजीनामा देण्याआधी त्यांनी एकदातरी पवार साहेबांशी बोलायला पाहिजे होते. काही मराठी प्रसारमाध्यमांनी शरद पवार यांच्या वक्तव्याचा विपर्यास करत त्यांनी मोदींची पाठराखण केल्याचे म्हटले होते. मात्र, तारिक अन्वर यांनी त्यामागील नेमका अर्थ समजून घ्यायला पाहिजे होता, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विनाकारण काहीही संबंध लावला असेल तर त्यासाठी पवारांना जबाबदार कसे धरता येईल? त्यांनी लोकांच्या मनात मोदींबद्दल संशय नाही, असे म्हटले होते. याचा अर्थ पवारांनी मोदींनी क्लीन चीट दिली, असा होत नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.
मात्र, कुणीतरी वावड्या उठवल्यामुळे तारिक अन्वर यांनी पक्षाचा राजीनामा दिला, ही गोष्ट धक्कादायक आहे. ते राष्ट्रवादीतले मोठे नेते होते. राष्ट्रवादीकडून ते 12 वर्ष खासदार राहिले. त्यांचं संघटन कौशल्य कौतुकास्पद आहे. दोन वेळा त्यांना राज्यसभेवर पाठवले. यावेळी ते राष्ट्रवादीच्या तिकीटावर लोकसभेवर निवडून गेले होते. एवढं करूनही पवारांच्या मराठीतील वक्तव्याचा अर्थ नीट समजून न घेता त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला, अशी खंत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.