मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये पेटीएमचा फिल्ड मॅनेजर गौरव गुप्ताने आत्महत्या केली आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान घटनेच्या तिसऱ्या दिवशी त्यांच्या पत्नीने विष पिऊन जीव देण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने वेळीच रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी सकाळी ही घटना घडली. सकाळी गौरव गुप्ता यांची पत्नी मोहिनीने घरातच विष प्यायलं. मोहिनी याने आपल्या सासरी कोणालाच याची कल्पना येऊ दिली नाही आणि बाथरुममध्ये जाऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. बाथरुममध्ये तिचा तोल गेल्याने कुटुंबाने तिला सांभाळलं. पण तिची प्रकृती बिघडत होती. यामुळे सासरच्यांनी चौकशी केली असता तिने विष प्यायलं असल्याचं उघड झालं. यानंतर कुटुंबाने तात्काळ मोहिनी यांना घेऊन रुग्णालय गाठलं. जयारोग्य रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांना त्यांना वाचवण्यात यश आलं असून, सध्या प्रकृती स्थिर आहे. 


मृत व्यक्तीच्या भावाचा धक्कादायक खुलासा


विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणी गौरव गुप्ता यांचा मामेभाऊ नीरज गुप्ताने धक्कादायक दावा केला आहे. नीरज गुप्ताने दावा करत म्हटलं आहे की, मोहिनी गुप्ता यांना 7 दिवसांपूर्वीही विष प्यायचं होतं. यामुळेही गौरव गुप्ता त्रस्त होते. नीरज गुप्ता यांच्या दाव्याने प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. 


पत्नी मोहिनी यांचं म्हणणं आहे की, गौरव यांना आपली नोकरी जाण्याची भिती होती. याच भितीपोटी त्यांनी आत्महत्या केली. पण गौरव यांचा भाऊ नीरजने नोकरीत त्यांना काही अडचण नव्हती असं सांगितलं आहे. गौरव यांना 9 लाखांचं पॅकेज होतं. याशिवाय त्यांना इतर कंपन्यांमधूनही नोकरीच्या ऑफर होत्या. 


आपलं गौरवशी बोलणं झालं होतं. त्याने आपल्याला कोणताही त्रास नसल्याची माहिती दिली होती असंही त्याने सांगितलं आहे. 


इंदोरमध्ये आत्महत्या


पेटीएमचे फिल्ड ऑफिसर गौरव गुप्ता यांनी 25 फेब्रुवारीला गळफास घेत आत्महत्या केली. 26 फेब्रुवारीला पोस्टमॉर्टम केल्यानंतर त्यांचा मृतदेह ग्वालियरला नेण्यात आला. 27 फेब्रुवारीला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 


2 लहान मुलींचं छत्र हरपलं


गौरव गुप्ता यांच्या आत्महत्येनंतर तिसऱ्या दिवशीच पत्नी मोहिनीने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मोहिनी आणि गौरव यांचं 8 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. ते इंदोरमध्ये पत्नी, 2 मुली आणि मेहुणीसह राहत होते. गौरव गुप्ता यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.