Paytm Founder विजय शेखर शर्मा यांना अटक, या कारणामुळे चौकशी
विजय शेखर शर्माला पोलिस ठाण्यात बोलावून अटक करण्यात आली.
मुंबई : पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. विजय शेखरला 22 फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती. मात्र, नंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. परंतु विजय शेखर शर्मा यांनी असं काय केलं असा प्रश्न लोकांना पडला आहे. खासकरुन पेटीएमच्या ग्राहकांना यामुळे धक्का बसला आहे, कारण जर त्यांना फ्रॉडसंदर्भात अटक केली असेल, तर मात्र काही खरं नाही. परंतु तसे नाही त्यांना दिल्ली पोलिसांनी वेगळ्याच कारणासाठी अटक केली आहे. खरं तर, मदर इंटरनॅशनल स्कूलसमोर शर्मा यांनी दक्षिण दिल्लीच्या डीसीपी बेनिता मेरी जॅकर यांच्या कारला त्यांच्या जग्वार लँड रोव्हर कारने भरधाव वेगात धडक दिली. त्यावेळी डीसीपीचा चालक दीपक अरबिंदो मार्गावर पेट्रोल भरण्यासाठी गेला होता.
विजय शेखर शर्मा यांनी दीपकला मारहाण करून तेथून ते कारमधून पळून गेले. पण दीपकने गाडीचा नंबर नोंदवला आणि सर्व प्रकार डीसीपींना सांगितला. डीसीपीच्या सांगण्यावरून दीपकने मालवीय नगर पोलिस ठाण्यात आयपीसी 279 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
कारचा क्रमांक गुरुग्राममधील एका कंपनीचा होता. कंपनीच्या लोकांनी सांगितले की कार जीके-2 मध्ये राहणारे विजय शेखर शर्मा यांच्याकडे आहे.
त्यानंतर विजय शेखर शर्माला पोलिस ठाण्यात बोलावून अटक करण्यात आली. मात्र, पोलिसांच्या या कारवाईनंतरही विजय शेखर शर्माला जामीन मिळाला. कारण त्याच्यावर दाखल गुन्ह्यात जामीनपात्र कलम लावण्यात आले होते.
पेटीएम पेमेंट बँकेवर आरबीआयची धडक
आरबीआय (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) ने पेटीएम पेमेंट्स बँकेवर मोठी कारवाई केली. आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेला पुढील आदेश येईपर्यंत नवीन ग्राहक जोडण्यास मनाई केली होती. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने, बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 35A अंतर्गत, इतर गोष्टींबरोबरच, आपल्या अधिकारांचा वापर करून, पेटीएम पेमेंट्स बँक लि. ला तात्काळ प्रभावाने, नवीन ग्राहकांना जोडण्यास मनाई करण्याचे निर्देश दिले.
याशिवाय, आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेला आयटी प्रणालीचे सर्वसमावेशक सिस्टम ऑडिट करण्यासाठी आयटी ऑडिट फर्म नियुक्त करण्याचे निर्देश दिले होते. आरबीआयने आपल्या आदेशात म्हटले आहे की पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड आता आयटी ऑडिटर्सच्या अहवालाचे पुनरावलोकन केल्यानंतर आरबीआयकडून परवानगी मिळाल्यानंतरच नवीन ग्राहक जोडू शकेल.