Paytm चे ग्राहकांना नववर्ष गिफ्ट, पुन्हा सुरू केल्या दोन सेवा
पेटीएमच्या माध्यमातून रेल्वेचे तिकीट बुक करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.
मुंबई - पेटीएमचा (Paytm)वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अगदी छोट्या रकमेचे बिल चुकते करण्यापासून ते मोठी रक्कम एखाद्याला पाठवण्यापर्यंत सर्वच कामांसाठी पेटीएम अॅपचा वापर केला जातो. पण काही महिन्यांपूर्वी पेटीएमने रिझर्व्ह बॅंकेच्या आदेशानुसार केवायसी प्रक्रिया बंद केली होती. नववर्षात ती पुन्हा सुरू करण्यात आली आहे. रिझर्व्ह बॅंकेने पेटीएमला केवायसी प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर ही सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. यामुळे नव्या लोकांना पेटीएम पेमेंट्स बॅंकेच्या विविध सेवांचा फायदा घेता येईल. गेल्यावर्षी जूनमध्ये रिझर्व्ह बॅंकेने ऑडिटनंतर पेटीएमला केवायसी स्थगित करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे नवे ग्राहक पेटीएमशी जोडले जाण्यावरही निर्बंध आले होते.
पेटीएमच्या माध्यमातून रेल्वेचे तिकीट बुक करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. आता पेटीएमच्या माध्यमातून तिकीट बुक करण्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे शुल्कही माफ करण्यात आले आहे. म्हणजेच पेटीएमच्या माध्यमातून तिकीट बुक करताना पेमेंट गेटवे आणि सेवा शुल्क द्यावे लागणार नाही. केवळ रेल्वेच्या भाड्याचे पेसे ग्राहकांना द्यावे लागतील. पेटीएमच्या माध्यमातून रेल्वेचे तिकीट बुक करणे किंवा पीएनआर स्टेटस बघणे अवघ्या काही मिनिटांमध्ये शक्य होते. त्याचबरोबर पेटीएमच्या माध्यमातून काढलेले तिकीट रद्द केले तर ग्राहकांना लगेचच त्यांच्या खात्यामध्ये रिफंड मिळणार आहे.
पेटीएमने गेल्या वर्षी आपल्या प्रवासविषयक सेवा व्यवसायात तिप्पट वाढ केली होती. वित्तीय वर्ष २०१८ मध्ये पेटीएमच्या माध्यमातून विक्री करण्यात आलेल्या तिकिटांची संख्या ३.८० कोटी इतकी आहे. पेटीएमच्या माध्यमातून रेल्वे तिकीट बुक करणाऱ्यांची संख्याही ९० लाखांच्या घरात गेली आहे. पेटीएमचा प्रवासविषयक सेवा बंगळुरूमधून चालतात. यासाठी ३०० कर्मचाऱ्यांची टीम कार्यरत आहे.