श्रीनगर : पीडीपीच्या महबूबा मुफ्ती यांनी पुन्हा एकदा जम्मू आणि काश्मीर परिसरात सुरू असणाऱ्या परिस्थितीकडे सर्वांचच लक्ष वेधलं आहे. पुलवामा येथील एका तरुणाला धमकावल्याचा आरोप करत संबंधित सैन्यदल अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. पुलवामाच्या तरुणाला एनकाऊंटरमध्ये मारण्याची धमकीही या अधिकाऱ्याकडून देण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'सैन्यदल प्रमुख आणि राज्यपालांना मी विनंती करते की त्यांनी या सर्व प्रकरणामध्ये लक्ष द्यावं. सैन्यदल अधिकाऱ्यांनी नेमकं त्या मुलाला असं का धमकावलं की त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं?', असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तौसिफ वानी या तरुणाची एसएचएमएस या रुग्णालयात भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी याविषयीची माहिती दिली. 


शादीमर्ग येथील सैन्यदलाच्या तंबूत बोलवून मेजर शुक्ला नावाच्या सैन्यदल अधिकाऱ्याने आपल्याला धमकावल्याची माहिती त्या मुलाने दिली होती. हातात बंदूक घेऊन आपल्याला पोझ देण्यास सांगण्यात आलं, असं न केल्यास एनकाऊंटरमध्ये आपला खात्मा करण्याची धमकी देण्यात आली, अशी माहिती वानीने दिल्याचं वृत्त झी न्यूजने प्रसिद्ध केलं. 


'२३ वर्षांपूर्वी तौसिफच्या वडिलांचा एका दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्याचा भाऊ भारतीय सैन्यदलात कार्यरत आहे', असं म्हणत आमच्या लोकांनाच इथे अशी वागणूक देण्यात येत आहे. ज्यांचे नातलग सैन्यदलात कार्यरत आहेत त्यांच्याशीच असं वागलं जात असेल तर इतरांचं काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शुक्ला हे त्यांच्या शौर्यासाठी ओळखले जाता हे खरं असलं तरीही हे नेमकं कोणत्या प्रकारचं शौर्य आहे असं सांगत एका व्यक्तीला सैन्याच्या तंबूत बोलवून त्यावा धमकावण्यात नेमकं कसलं सामर्थ्य हा सवाल वारंवार विचारत त्यांनी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहशतवादविरोधी भूमिकेवरगही त्यांनी यावेळी वक्तव्य केलं. दहशतवादाचा कणा मोडण्याविषयीच्या त्यांच्या निर्धाराविषयी सांगत काश्मीरमधील हा प्रश्न राजकीय असून, सैन्याच्या मदतीने तो सुटणार नाही, जोपर्यंत संबंधित व्यक्ती आणि पाकिस्तानशी चर्चा होत नाही तोपर्यंत ही तेढ सुटणार नाही ही बाब त्यांनी अधोरेखित केली.