नवी दिल्ली : संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी पाकव्याप्त काश्मीरबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. 'लवकरच पाकव्याप्त काश्मीरमधली जनता आम्हाला पाकिस्तानसोबत राहायचं नाही, तर भारतामध्ये यायचंय अशी मागणी करेल. यासाठी थोडा काळ थांबा. ज्यादिवशी ही घटना घडेल, त्यादिवशी देशाच्या संसदेचं ध्येय पूर्ण होईल,' असं राजनाथ सिंग म्हणाले आहेत. राजनाथ सिंग 'जम्मू जन संवाद रॅली'मध्ये बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मोदींच्या नेतृत्वात जम्मू-काश्मीरचं भाग्य येत्या काही वर्षांमध्ये बदलेल. जम्मू-काश्मीर येत्या काळात नव्या उंचीवर जाईल. याआधी काश्मीरमध्ये काश्मीर आझादीची आंदोलनं व्हायची, पाकिस्तान आणि आयएसआयएसचे झेंडे फडकवले जायचे, पण आता फक्त भारताचाच झेंडा दिसत आहे,' असं राजनाथ सिंग म्हणाले. 



जम्मू-काश्मीरसाठी सरकारने कलम ३७० रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याचंही राजनाथ सिंग यांनी या रॅलीमध्ये बोलताना सांगितलं. राजनाथ सिंग यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या रॅलीला संबोधित केलं.