नवी दिल्ली : लॉकडाऊन दरम्यान दिल्लीतील नागरिकांना पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे. दिल्लीमधील चिल्ला गाव परिसरामध्ये पाणी पुरवठा होत नसल्याने लोकांना तासन् तास पाण्याच्या टँकरसाठी रांगेत उभं राहण्याची वेळ आली आहे. पाणी वेळेत उपलब्ध नसल्यामुळे या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नसल्याचे चित्र समोर येत आहे. टँकरमधील पाणी संपूर्ण गावासाठी पुरेसं नसल्यामुळे स्थानिकांना पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एएनआयने ट्विटरच्या माध्यमातून या बातमीला दुजोरा दिला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार  टँकर गावामध्ये तीन चार दिवसातून एकदाच येतो. म्हणून भर उन्हात पाणी भरण्यासाठी स्थानिकांच्या लांबचं लांब रांगा असतात.  ‘दिल्ली जल बोर्डा’कडून या ठिकाणी पाणी पुरवठा करण्यात येतो. पण तो देखील पुरेसा नसल्यामुळे पाण्यासाठी स्थानिकांना पाण्याच्या शोधात दूरपर्यंत जावे लागते. 



कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे देशातील नागरिकांनी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. देशातील कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. ही वाढ लक्षात घेता १४ एप्रिल रोजी शिथिल होणाऱ्या लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला. यंदाचा लॉकडाऊन १९ दिवसांसाठी वाढवण्यात आला आहे. आता हा लॉकडाऊन ३ मे पर्यंत असणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या अडचणी देखील वाढल्या आहेत. वाढत्या अडचणींमुळे सोशल डिस्टसिंगचे सुद्धा बारा वाजले आहेत. 


दरम्यान, भारतात कोरोना बाधितांची संख्या १४ हजार ३७८ वर गे, तर या धोकादायक विषाणूने आतापर्यंत ४८० रुग्णांचा बळी घेतला आहे. या सर्व घडामोडींमध्ये दिलासादायक बाब म्हणजे १ हजार ९९२ रुणांनी या आजारावर मात केली आहे.