जयपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शनिवारी जयपूर येथे झालेल्या सभेवेळी सुरक्षारक्षकांनी घेतलेल्या पवित्र्यामुळे अनेक लोकांना घरी परतावे लागले. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचे लाभार्थी या सभेला मोठ्याप्रमाणावर आले होते. मात्र, यापैकी अनेकांना काळे कपडे घातल्यामुळे मोदींचे भाषण न ऐकताच माघारी फिरावे लागले. शर्ट, पँट किंवा बनियन यापैकी कोणताही कपडा काळ्या रंगाचा असेल तर त्या लोकांना प्रवेशद्वारावरच अडवले जात होते. तर काळ्या रंगाची ओढणी, मोजे आणि रुमालासारखे लाहन कपडे बाहेरच ठेवायला सांगण्यात आले होते. त्यामुळे मेटल डिटेक्टरजवळ काळ्या कपड्यांचा ढीग तयार झाला होता. मोदींच्या कार्यक्रमादरम्यान कोणी आंदोलन किंवा निषेध करु नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात आल्याचे सांगितले जाते. 


साहजिकच सुरक्षारक्षकांनी ऐनवेळी घेतलेल्या या भूमिकेविषयी लोकांनी नाराजी व्यक्त केली. किमान राज्य सरकारने कार्य़क्रमाच्या जाहिरातीमध्ये 'काळे कपडे परिधान करुन कार्यक्रमाला येऊ नका', अशी माहिती द्यायला हवी होती, असे लोकांनी सांगितले. दरम्यान, या सभेत मोदींनी जनतेशी संवाद साधताना काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवला. केंद्र सरकार किंवा वसुंधरा राजे सरकारने चांगले काम केले तरी विरोधक कधीच त्याचे कौतुक करत नाहीत. प्रत्येकजण केवळ आपले हितसंबंध कसे जपता येईल, हे बघतो. मी केलेल्या कामांमुळे एक विशिष्ट वर्ग दुखावला गेला आहे. यापूर्वीच्या सरकारने राजस्थानची अवस्था काय करुन ठेवली होती, हे कधीच विसरु नका, असे आवाहन मोदींनी जनतेला केले. तसेच सध्या काँग्रेसचे अनेक नेते जामिनावर बाहेर असल्यामुळे लोक त्यांच्या पक्षाला 'बेलगाडी' म्हणत असल्याचा टोलाही मोदींनी लगावला.