निवडणूक निकालानंतर सहाव्या दिवशीही पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ
पेट्रोलच्या किंमती वाढण्याचे सत्र मंगळवारी सलग पाचव्या दिवशीही सुरु राहीले.
नवी दिल्ली : पेट्रोलच्या किंमती वाढण्याचे सत्र मंगळवारी सलग पाचव्या दिवशीही सुरु राहीले. एक दिवसाच्या विश्रांतीनंतर डिझेलच्या किंमतीत देखील वाढ झाली आहे. तेल विपणन कंपन्यानी पेट्रोल-डिझेलच्या किंमती दिल्ली, कोलकाता आणि मुंबईत 9 पैसे प्रति लीटरने वाढवल्या आहेत. तर चेन्नईमध्ये 19 पैसे प्रति लीटर दर वाढवण्यात आले आहेत. चार प्रमुख शहरांमध्ये डिझेलच्या किंमती पाच पैशांनी वाढवल्या आहेत. इंडीयन ऑईलच्या वेबसाईटनुसार मुंबईत पेट्रोलची किंमत 77 रुपये 47 पैसे इतकी आहे. दिल्लीमध्ये 71.86 तर कोलाकातामध्ये 73.92 रुपये प्रति लीटर पेट्रोल मिळत आहे. मुंबईत डिझेल 69.88 रुपये तर चेन्नईत 70 .50 रुपये प्रति लीटर मिळत आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींपासून सध्या तरी दिलासा मिळणे शक्य नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत रविवारी सलग चौथ्यांदा वाढ सुरु राहीली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती गेल्या काही दिवसात वाढत आहेत. त्यामुळे देशातील तेल विपणन कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 3 रुपये प्रति लीटरने वाढ करु शकतात.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वेगाने वाढल्या पण लोकसभा निवडणुकी दरम्यान तेल विपणन कंपन्यांनी यावर नियंत्रण ठेवले. यानंतर आपल्याला झालेले नुकसान भरून काढण्यासाठी किंमती वाढवण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्याकडे नव्हता असे एंजल ब्रोकींगचे अनुज गुप्ता सांगतात.