मुंबई : गेल्या 55 महिन्यांमध्ये पेट्रोलचे दर सर्वात उच्चस्तरावर पोहोचले आहेत. पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅस सिलेंडर भाववाढीच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे आज देशव्यापी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी देशात ठिकठिकाणी आंदोलन करुन भाजप सरकार विरोधात आंदोलन केलं. या दरम्यान अनेक काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे देशात आंदोलन सुरु असताना आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी राज्यात डिझेल आणि पेट्रोलच्या दरात 2 रुपये कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीमध्ये आज पेट्रोलचा दर 80.73 रुपये लीटर तर डिझेलचा दर 72.83 रुपये लीटर आहे. 


आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी घोषणा केली आहे की, राज्यात मंगळवारपासून पेट्रोल आणि डिझेल दोन रुपयांनी स्वस्त केलं जाणार आहे. आंध्र प्रदेश सरकार पेट्रोलवर 36.42 टक्के आणि डिझेलवर 29.12 टक्के टॅक्स वसूल करते.


रविवारी राजस्थान सरकारने देखील राज्यातील नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी राज्य सरकारचा वॅल्यू अॅडेड टॅक्स (वॅट) 4 टक्क्यांनी कमी केला आहे. जयपूरमध्ये पेट्रोल 83.54 आणि डिझेल 77.43 रुपये लीटरवर पोहोचलं आहे.