नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा झटका बसला आहे. सलग वाढणाऱ्या दरांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरणं आहे. गेल्या एका महिन्यात पेट्रोलच्या किंमतीत २.५ रुपयांची वाढ झाली आहे. तर, डिझेलच्या किंमतीनेही उच्चांक गाठला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत नागरिकांना या दरवाढीपासून दिलासा मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. गेल्या महिन्याभराचं बोलायचं झालं तर, राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर ६९.३५ रुपयांवरुन ७१.८९ रुपये प्रति लिटरवर पोहोचला.


का वाढत आहेत किमती?


आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि भारतीय चलन कमकुवत झाल्याने पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत.


इतकं महाग होऊ शकतं पेट्रोल


मॉर्गन स्टेनली आणि बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचने २०१८ साठी कच्च्या तेलाच्या सरासरी भावानुसार दरवाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीने तीन वर्षांतील उच्चांक गाठला आहे. बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचने आपल्या अंदाजानुसार ८ डॉलरची वाढ केली आहे.


२०१८मध्ये ब्रेंट क्रूडचा सरासरी भाव ६४ डॉलर आणि WTI क्रूडचा सरासरी भाव ६० डॉलर राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे तज्ञांच्या मते, पेट्रोलचे दर ८५ रुपये प्रति लिटर पोहण्याची शक्यता आहे.


डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत


डॉलरच्या तुलनेत रुपयात अचानक घसरण झाली. त्यामुळे तेल कंपन्यांचा खर्च वाढण्यास सुरुवात झाली आणि त्यांना पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढवाव्या लागल्या. जर, रुपया आणखीन कमकुवत झाला तर पेट्रोल-डिझेलच्या किंमती आणखीन वाढू शकतात.


अशा ठरतात पेट्रोल-डिझेलच्या किंमती


एनर्जी एक्सपर्ट्सच्या मते, ऑईल मार्केटिंग कंपन्या तीन गोष्टींच्या आधारे पेट्रोल-डिझेलच्या किंमती ठरवतात. पहिलं म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातली क्रूड (कच्च्या तेलाच्या किंमती). दुसरं म्हणजे देशात इंपोर्ट (आयात) करताना भारतीय रुपयाची डॉलरच्या तुलनेत किंमत. तर, तिसरी गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल-डिझेलच्या किंमती काय आहेत.