पेट्रोल-डिझेलवरील एक्साईज ड्यूटी, रोड सेस वाढवला; इतक्या फरकाने वाढले दर
एक्साईज ड्यूटी आणि रोड सेस वाढल्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली असली तरी नागरिकांना याचा फटका बसणार नाही.
नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवर एक्साईज ड्यूटी अर्थात उत्पादन शुल्क आणि रोड सेस वाढवण्यात आला आहे. पेट्रोलवर 8 रुपये रोड सेस आणि 2 रुपये एक्साईज ड्यूटी वाढवण्यात आली एकून किंमतीत 10 रुपये प्रतिलीटर वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे डिझेलवरही 8 रुपये रोड सेस आणि 5 रुपये एक्साईज ड्यूटी वाढवण्यात आली असून एकूण 13 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
परंतु दिलासादायक बाब म्हणजे एक्साईज ड्यूटी आणि रोड सेस वाढल्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत झालेली वाढ पेट्रोलपंपावर नागरिकांसाठी लागू करण्यात आलेली नाही.
या किंमतीतील वाढीमुळे सरकारला जो फायदा होईल तो इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ऑईल कंपन्यांना क्रूड ऑईल अर्थात कच्चं तेल स्वस्त दरात मिळत आहे. त्यामुळे कंपन्यांना काही प्रमाणात फायदा होत आहे. मात्र सध्या ब्रेंट क्रूड ऑईलचे दर पुन्हा वाढत असून सध्या याची किंमत जवळपास $30 प्रति बॅरल इतकी आहे.
याआधीदेखील दिल्ली सरकारने सोमवारी सकाळपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर संध्याकाळी पंजाब सरकारनेही पेट्रो-डिझेलच्या दरांत दोन रुपये प्रति लीटरच्या वाढीची घोषणा केली.