पेट्रोल-डिझेलनंतर CNG-PNG चे दर ही वाढणार, इतक्या रुपयांनी महागणार
पेट्रोल आणि डिझेल महागण्याची शक्यता असतानाच आता सीएनजी गॅसही महागणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे.
मुंबई : देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल 10 मार्चला लागणार आहे. त्यामुळे 10 मार्चनंतर डिझेल आणि पेट्रोलच्या दरात 10 ते 12 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. पण यासोबतच सीएनजी (CNG Price Hike) देखील 10 रुपयांनी महाग होण्याची शक्यता आहे. घरांमध्ये वापरला जाणारा पीएनजी गॅस (PNG Price Hike) देखील पाच रुपये किलोने महागणार आहे. (CNG and PNG Hike)
या दरवाढीनंतर सीएनजीची किंमत प्रति किलो 80 रुपये आणि पीएनजीची किंमत 40 रुपये प्रति मानक घनमीटरच्या वर जाऊ शकते.
ग्रीन गॅसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, 10 मार्च रोजी निवडणुकीचे निकाल येताच डिझेल-पेट्रोलच्या किमती (Petrol-diesel price Hike) वाढतील असा विश्वास आहे. त्याचवेळी रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे ग्रीन गॅसने (Green Gas) परदेशातून येणाऱ्या वायूचा कोटा 20 टक्क्यांनी कमी केला असून, त्याचा थेट परिणाम दरावर होणार आहे. पीएनजी पाच रुपय तर सीएनजी 10 रुपयांनी महाग होईल, अशी शक्यता आहे.
गॅसचे दर अनेक कारणांमुळे बदलतात. सध्या रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम दरांवर होत आहे. कंपनीला सरकारकडून ज्या किमतीला गॅस मिळतो, त्या आधारावर ते ऑपरेटिंग खर्च जोडून त्याचे दर ठेवते. सध्याच्या परिस्थितीमुळे सीएनजी-पीएनजीचे दर वाढण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.