नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफकडून (Employee Provident Fund) कर्मचाऱ्यांसाठी ई-नॉमिनेशन सुविधा सुरु करण्यात आली आहे. आधार कार्ड पीएफ खात्याशी लिंक असलेल्या व्यक्तींनाच या सुविधेचा फायदा मिळणार आहे. पीएफ खातेधारक आपल्या खात्याशी ई-नॉमिनेशनद्वारे कुटुंबातील कोणत्याही सदस्याला नॉमिनी करु शकतात. ई-नॉमिनेशनद्वारे ऑनलाईन पेन्शन क्लेम करण्यासाठी याचा फायदा होणार आहे. विशेष बाब म्हणजे ई-नॉमिनेशन झाल्यानंतर, खातेधारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनी पीएफसाठी ऑनलाईन क्लेम करु शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

PF खातेधारकाने नॉमिनी न ठेवल्यास खातेधारकाचे पैसे अडकण्याची शक्यता असते. EPFOने गेल्या वर्षी ही सुविधा सुरु केली होती. परंतु अद्यापही अनेक खातेधारकांनी नॉमिनेशनची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. आता EPFO यात आणखी एक अट जोडण्याच्या तयारीत आहेत. खातेधारकाने त्याच्या पीएफ अकाऊंटमध्ये नॉमिनी न जोडल्यास तो पीएफ काढू शकत नाही. कोणताही क्लेम करु शकत नाही. क्लेम करण्याआधी ई-नॉमिनेशन करणं आवश्यक असेल. 


ई-नॉमिनेशन करण्यासाठी -


ईपीएफओच्या 'मेंबर सर्विस पोर्टल'वर आपल्या अकाऊंटमध्ये लॉग-इन करत, सदस्य ई-नॉमिनेशन सुविधेचा वापर करु शकतात. ई-नॉमिनेशनसाठी UAN नंबर सक्रिय असणं आवश्यक आहे. याशिवाय 'मेंबर सर्विस पोर्टल'वर फोटो असणं गरजेचं आहे. UAN नंबर आधारशी लिंक असायला हवा. आधारशी लिंक असल्यास OTPद्वारे अकाऊंट व्हेरिफाय होऊ शकेल. 


ई-नॉमिनेशनचे नियम -


ईपीएफओने दिलेल्या माहितीनुसार, ई-नॉमिनेशनसाठी पीएफ खातेधारक केवळ आपल्या कुटुंबातील व्यक्तीलाच नॉमिनेट करु शकतो. खातेधारकाचं कुटुंब नसल्यास तो दुसऱ्या व्यक्तीला नॉमिनेट करण्याची सूट खातेधारकाला आहे. परंतु कुटुंबिय असतानाही दुसऱ्या व्यक्तीला नॉमिनी केल्यास, ते नॉमिनेशन रद्द केलं जाऊ शकतं. ई-नॉमिनेशनसाठी आधार नंबर, पत्ता, जन्म तारीख, मोबाईल नंबर, बँक अकाऊंट आणि नॉमिनीचा स्कॅन केलेला फोटो पोर्टलवर अपलोड करावा लागेल.


महत्त्वाच्या गोष्टी -


EPFOने या महिन्यापासून ई-नॉमिनेशनबाबत परिपत्रक जाहीर केलं आहे. या परिपत्रकानुसार, ई-नॉमिनेशन करण्यासाठी खातेधारकाला आपल्या अकाऊंटमध्ये लॉन-इन केल्यानंतर एक मेसेज येईल. ऑनलाईन पेन्शन क्लेम करणं नॉमिनीच्या उपलब्धतेवर अवलंबून असते.




कसं कराल ई-नॉमिनेशन -


- EPFO पोर्टलवर लॉगइन करा. त्यानंतर UAN नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाका.
- त्यानंतर Viewचा ऑप्शन येईल. प्रोफाईलवर क्लिक करा. फोटो अपलोड केला नसल्यास तो अपलोड करा.
- Manage टॅबवर क्लिक करा आणि लिंक ई-नॉमिनेशवर जा. तेथे नॉमिनीचं नाव टाका. त्यानंतर कुटुंबिय आहे की नाही याबाबत प्रश्न विचारला जाईल. उत्तर होय असल्यास, कुटुंबाची माहिती विचारली जाईल. त्यानंतर नॉमिनीचा फोटोही अपलोड करावा लागेल.
- कुटुंबातील सदस्यांनुसार, 'Add New button'वर क्लिक करा. सर्वांची माहिती पूर्ण झाल्यानंतर 'Save Family Details'वर क्लिक करा.
- नॉमिनेशन आधारनंबरनुसार  (Aadhaar-based e-Sign), ई-साईनसह सेव्ह करा. ई-सिग्नेचरसाठी आधार व्हर्चुअल आयडी असणं आवश्यक आहे.
- Aadhaar-based e-Signनंतर नॉमिनेशन फॉर्म-२ची पीडीएफ कॉपी डाऊनलोड करुन एम्प्लॉई कोडसह सेव्ह करावं लागेल. PF सदस्यांना नॉमिनेशन फॉर्म-२ची पीडीएफ कॉपी HRकडे जमा केल्यानंतर नॉमिनेशन पूर्ण होईल.