लखनऊ : उत्तरप्रदेशच्या शाहजहांपूरमध्ये योग दिवसाला कॅबिनेट मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी एका सरकारी कर्मचाऱ्याकडून पादत्राणं चढवून घेताना दिसले. सरकारी कर्मचारी मंत्र्याला पादत्राणं चढवताना कॅमेऱ्यात कैद झाला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर थोड्याच वेळात व्हायरल झालाय. कॅबिनेट मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दाखल झाले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी आंतरराष्ट्रीय योग दिवसाला प्रभारी मंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यांत राहण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे, शुक्रवारी दुग्ध विकास मंत्री आणि प्रभारी मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी शाहजहांपूरमध्ये योग कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री स्वामी चिन्मयानंद आणि डीएम अमृत त्रिपाठीही उपस्थित होते. 



मिळालेल्या माहितीनुसार, योगाभ्यास केल्यानंतर निघालेल्या मंत्री महोदयांना पादत्राणं चढवायची होती. परंतु, आपली पादत्राणं चढवण्यासाठी ते खाली वाकले नाहीत किंवा त्यांना वाकता आलं नाही...  त्यामुळे एका सरकारी कर्मचाऱ्यानं त्यांचे बूट उचलले आणि आपल्या हातांनी त्यांच्या पायांमध्येही चढवले. 


कर्मचारी मंत्री महोदयांच्या पायांत बूट चढवत असताना कुणीतरी याचं चित्रण केलं... आणि हे फोटो आता सोशल मीडियात व्हायरल झालेत.