नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारा अनुच्छेद ३७० रद्द केल्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. मात्र, यावेळी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी याचिकाकर्ते एम एल शर्मा यांना चांगलेच फैलावर घेतले. ही नक्की कशाप्रकारची याचिका आहे. मी गेल्या अर्धा तासात जवळपास तीनवेळा याचिका वाचली. मात्र, मला काहीच बोध होत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही याचिका मी फेटाळलीही असती, पण त्याचा इतर याचिकांवर परिणाम होईल. त्यामुळे मी हा निर्णय घेणे टाळत आहे. मात्र, अनुच्छेद ३७० रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या सहापैकी चार याचिका या निरर्थक असल्याचे मतही सरन्यायाधीशांनी व्यक्त केले. 


यानंतर याचिकाकर्ते एम.एल. शर्मा यांनी आपण याचिकेत आवश्यक त्या सुधारणा करू, असे न्यायालयाला सांगितले.


दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांनी तांत्रिक बाबींमध्ये सुधारण केल्यानंतर पुढील आठवड्यात या प्रकरणाची सुनावणी होण्याची शक्यता आहे. 


काही दिवसांपूर्वीच काश्मीरमधील अनुच्छेद ३७० करण्यासंदर्भातील प्रस्ताव संसदेत मंजूर झाला होता. मात्र, काँग्रेससह काही विरोधी पक्षांनी या निर्णयाला विरोध केला होता. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरु आहे.