नवी दिल्ली: पंतप्रधान कार्यालयाकडून बुधवारी PM CARES Fund मधील खर्चाचा तपशील जाहीर करण्यात आला. त्यानुसार या फंडातील ३१०० कोटी रुपये कोरोनाविरुद्धच्या उपाययोजनांसाठी वापरले जात असल्याचे PMO ने म्हटले आहे. ३१०० कोटी रुपयांपैकी साधारण २००० कोटी व्हेंटिलेटर्सच्या खरेदीसाठी वापरले जातील. तर स्थलांतरित मजुरांसाठी १००० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर १०० कोटी कोरोनावरील लसीच्या संशोधनासाठी देण्यात आल्याचे PMO ने म्हटले आहे. 



काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी PM CARES FUND मधील निधी कुठे खर्च झाला, याची माहिती जनतेला कळायलाच हवी, अशी मागणी केली होती. PM CARES FUND हा सुरुवातीपासूनच वादाचा विषय ठरला आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ मार्चला पंतप्रधान केअर फंडाची घोषणा केली. त्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळाद्वारे एका न्यासाची स्थापना करण्यात आली होती. या फंडावर नियंत्रणासाठी त्रिसदस्यीय मंडळ असून पंतप्रधान पदसिद्ध अध्यक्ष आहेत. देशातील अनेक बड्या उद्योगपतींनी या फंडासाठी कोट्यवधी रुपयांच्या देणग्या दिल्या आहेत. भाजपच्या महाराष्ट्रातील आमदारांनीही आपला एका महिन्याचा पगार या फंडात जमा केला होता. तसेच अनेक खासदारांचे वेतन आणि विकासकामांचा निधीही या फंडात वर्ग करण्यात आला होता. त्यामुळे या निधीचा विनियोग कसा होतो, याचे ऑडिट केले जावे, अशी मागणी सातत्याने विरोधकांकडून केली जात होती. अखेर मोदी सरकारने यापैकी काही खर्चाचा तपशील उघड केला आहे. यामुळे विरोधक समाधानी होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.