नवी दिल्ली: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून मोठा गाजावाज करत जाहीर करण्यात आलेल्या आत्मनिर्भर पॅकेजच्या उपयुक्तततेविषयी आता पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागारांकडूनच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्य आशिमा गोयल यांनी आत्मनिर्भर पॅकेज परिपूर्ण नसून त्यामध्ये सुधारणेला वाव असल्याचे म्हटले. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मागणी वाढवण्याची गरज आहे. तसेच मागणी व पुरवठ्याचा समतोलही सरकारने साधला पाहिजे, असे गोयल यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान मोदींकडून कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा; ज्येष्ठ मंत्र्यांशी सल्लामसलत


आशिमा गोयल शनिवारी पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन वार्तालापात बोलत होत्या. यावेळी आशिमा गोयल यांनी म्हटले की, केंद्र सरकारने जाहीर केलेले आर्थिक पॅकेज परिपूर्ण नाही. त्यामधील त्रुटी दूर करुन हे पॅकेज अधिक चांगले करता येईल. कोरोनाचे संकट हे अर्थव्यवस्थेसाठी एक मोठा पण तात्पुरता धक्का आहे. 'ह्युमन कॅपिटल' सुस्थितीत असेल तर अशा धक्क्यानंतर तेजीने सुधारणा पाहायला मिळते, असेही गोयल यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी तब्बल २० लाख कोटींच्या आत्मनिर्भर पॅकेजची घोषणा केली होती. यामध्ये सूक्ष्म आणि लघूमध्यम उद्योग, स्थलांतरित मजूर, बिगरबँकिंग संस्था आणि समाजातील विविध घटकांसाठी आर्थिक मदत जाहीर करण्यात आली होती. मात्र, यापैकी बहुतांश मदत ही कर्जाच्या स्वरुपात आहे. त्यामुळे गरजू लोकांच्या खिशात थेट पैसा जाणार नाही. याशिवाय, या पॅकेजमधील अनेक घोषणा अर्थसंकल्पाचा भाग असल्याची टीका विरोधकांनी केली होती.