PM Modi In Rajya Sabha: `मोदी-अदानी भाई भाई`च्या विरोधकांच्या घोषणांमध्ये मोदींचं राज्यसभेत भाषण
PM Modi address in Rajya Sabha amid opposition protest: मोदींचं भाषण सुरु असताना विरोधकांनी `मोदी-अदानी भाई भाई` अशा घोषणा दिल्या. विरोधकांच्या घोषणाबाजीमध्येच मोदींनी भाषण दिलं.
PM Modi address in Rajya Sabha amid opposition protest: लोकसभेमधील भाषणामध्ये काँग्रेसच्या (Congress) घोटाळ्यांचा उल्लेख करत बुधवारी तुफान शाब्दिक फटकेबाजी करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Modi) आज राज्यसभेमध्ये (Rajya Sabha) विरोधकांच्या घोषणाबाजीचा सामना करावा लागला. विरोधकांच्या मोदी-अदानी भाई भाईच्या घोषणांमध्ये पंतप्रदान मोदींनी सभागृहाला संबोधित केलं. विरोधकांच्या घोषणाबाजीला उत्तर देताना मोदींनीही शाब्दिक टोलेबाजी केली. "जितका चिखल फेकला जाईल तितका कमळ फुलून येईल. त्याच्याकडे चिखल आहे, माझ्याकडे गुलाल आहे. ज्याच्याकडे जे असणार ते तो उधळणार," असं म्हणत मोदींनी या शेरेबाजीला उत्तर दिलं.
अदानी अदानी घोषणाबाजी
पंतप्रधान मोदींनी बुधवारी लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिषाणावर आभार व्यक्त करताना केलेल्या भाषणामधून काँग्रेसला टोले लगावल्यानंतर आज अभूतपूर्व गोंधळात मोदींना राज्यसभेत भाषण द्यावं लागलं. विरोधकांची 'अदानी अदानी', 'मोदी-अदानी', 'मोदी- अदानी भाई भाई'च्या घोषणाबाजीमध्येच मोदींना आपलं भाषण द्यावं लागलं. घोषणाबाजी सुरु झाल्यानंतर मोदींनीही विरोधकांचा आणि खास करुन काँग्रेसचा सामचार घेतला. "कमळ उमलण्यात विरोधकांचाही वाटा आहे," असं मोदींनी म्हटलं. मोदींचं भाषण सुरु असताना, 'मोदी-अदानी भाई भाई'च्या घोषणा पूर्ण वेळ सुरु होतं. यानंतर पंतप्रदान मोदींनी, "सभागृहामधील काही लोकांचं वागणं निराशाजनक आहे," असंही म्हटलं. याशिवाय मोदींनी काँग्रेसच्या 60 वर्षांच्या कार्यकाळामध्ये हवी तशी काम करण्यात आली नाहीत असं सांगताना काँग्रेसला लक्ष्य केलं.
6 दशकं वाया घालवली
"काँग्रेसनं कारभार करताना खड्डे पाडून ठेवले आहेत. काँग्रेसनं देशाची 6 दशकं वाया घालवली. 60 वर्ष काँग्रेसनं खड्डेच खड्डे केले होते. जेव्हा काँग्रेस खड्डे खोदत होती तेव्हा इतर देश प्रगती करत होते. काँग्रेसच्या लोकांनी जनतेच्या समस्या सोडवल्या नाही," अशी टीका मोदींनी केली. तसेच पंतप्रधानांनी, "सदनमधील चर्चेला देश गांभीर्याने घोतो," असं सांगत अप्रत्यक्षपणे भाषण ऐकून घेण्याबद्दलचं विधान केलं.
आधी काम केलं असतं तर...
"आम्ही समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचण्याच्या दृष्टीने काम केलं. देशातील व्यवस्थेवर लोकांचा विश्वास वाढला आहे. गावांमध्ये 22 तास वीज पुरवण्याचा आमचा प्रयत्न आहे. जनता काँग्रेसला पाहतेय आणि शिक्षा देतेय. आम्ही देशातील लोकांचा विश्वास जिंकला आहे. आम्ही राजकीय फायदा-तोटा न पाहता निर्णय घेतो. आम्ही देशामध्ये नवीन संस्कृती रुझवत आहोत. ही संस्कृती म्हणजे सर्वांना होणारा फायदा हीच खरी हीच खरी धर्मनिरपेक्षता. काँग्रेसला जनतेनं अनेकदा नाकारलं आहे. काँग्रेस आणि सहकारी पक्ष कट रचणं थांबवत नाही," असंही मोदी म्हणाले. "विचार चांगले असतील, काम करण्याची इच्छा असेल तर एवढी मेहनत करावी लागत नाही. आधी काम केलं असतं तर आज एवढी मेहनत करावी लागली नसती," असा टोलाही मोदींनी काँग्रेसला लगावला.