नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 68व्या मन की बातमधून जनतेशी संवाद साधला. देशभरात यंदा इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा होतोय. उत्सव आणि पर्यावरणाचं दृढ नातं आहे. निसर्ग संवर्धनासाठी उत्सवाचं आयोजन केलं जात असल्याचं मोदींनी सांगतिलं. कोरोनाच्या कठिण काळातही शेतकऱ्यांनी मोठं योगदान दिलं असून अन्नदाता शेतकऱ्यांना मोदींकडून मन की बातच्या सुरुवातीला नमन करण्यात आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान मोदींनी यावेळी मन की बातमध्ये बोलताना खेळण्यांच्या उद्योगावर भर देण्याचं आवाहन केलं आहे. कोरोना काळात मुलं वेळ कसा घालवत असतील? त्यांच्या भवितव्याबाबत मंथन केलं असल्याचं मोदी म्हणाले. जगभरात खेळण्यांची मोठी बाजारपेठ आहे. मात्र, खेळण्यांच्या या ग्लोबल इंडस्ट्रीत भारताचं योगदान अतिशय कमी असल्याचं मोदी म्हणाले. भारत आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत पुढे जात असून, भारतातील मुलांना भारतातच तयार केलेली नवीन खेळणी कशी मिळतील यावर विचार सुरु आहे, असंही मोदींनी सांगितलं.


भारतात खेळण्यांचे अनेक उद्योग समूह आहेत आणि हजारो कारागीर या कामाशी संबंधित आहेत. या उद्योगसमूहांना नाविन्यपूर्ण आणि सर्जनशील उपायांच्या माध्यमातून प्रोत्साहित केलं पाहिजे. भारतीय खेळण्यांच्या बाजाराच्या विस्तारास मोठा वाव आहे. आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देऊन या उद्योगात क्रांती होऊ शकते. खेळणी केवळ सांस्कृतिकदृष्ट्या मजबूत करत नाहीत तर खेळण्यांमुळे मुलांमध्ये मानसिक कौशल्यंही विकसित होत असल्याचं, पंतप्रधानांनी सांगितलं.


खेळण्यांची 7 लाख कोटींची मोठी बाजारपेठ आहे. टॉय इंडस्ट्री अतिशय व्यापक आहे. त्यामुळे या इंडस्ट्रीत भारताला पुढे जाण्यासाठी मोठी मेहनत करावी लागणार आहे. लोकल खेळणी वोकल करण्याचा प्रयत्न करुया. पर्यावरणालाही अनुकूल असतील अशी खेळणी तयार करावीत, खेळण्यांसह, मोबाईल, कॉम्प्युटर गेम्ससही भारतीय असावेत असं आवाहन मोदींनी केलं आहे. भारतीयांची इनोव्हेशनची क्षमता जगभरात लोकप्रिय आहे. भारतीयांच्या याच इनोव्हेशच्या जोरावर 'लेट द गेम बिगिन'चा नवा मंत्र मोदींनी दिला आहे. स्टेप्स सेट गो, चिंगारी यांसारख्या काही भारतीय ऍप्सचं मोदींनी कौतुक केलं असून, भारतीय ऍप्स वापरण्याचं आवाहनही केलं आहे.


प्रत्येक क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर करायचं असल्याचं मोदींनी सांगतिलं. आता सुरु झालेले छोटे-छोटे स्टार्टअपच पुढे जाऊन मोठ्या कंपन्या होणार आहेत. आताच्या मोठ्या कंपन्याही कधी-काळी स्टार्टअपचं होत्या, यासाठी सर्वांनी पुढे येऊन इनोव्हेट करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. 


नेशन आणि न्यूट्रीशनचा मोठा संबंध असल्याचं मोदींनी सांगितलं. जसं पोषक अन्न असतं तसाच आपला चांगला मानसिक विकास होता. मुलांच्या पोषणाप्रमाणेच आईलाही तितकंच पोषण मिळणं गरजेचं आहे. मुलं, मातांच्या पोषणाकडे विशेष लक्ष देण्याचं आवाहन मोदींनी केलं आहे. सप्टेंबरमध्ये पोषण महिना साजरा करणार असून, ज्या भागात जे उत्तम पिकतं, त्यानुसार भारतीय कृषी कोश तयार केला जात, असल्याची माहितीही मोदींनी दिली.