निकालांनंतर मोदींचा सूर नरमला; अधिवेशनात विरोधकांना सहकार्याचे आवाहन
भाजपची पिछेहाट पाहता मोदींचा सूर काहीसा मवाळ दिसला.
नवी दिल्ली: संसदेच्या मंगळवारपासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांना संसदेचे कामकाज चालवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, मिझोराम आणि तेलंगणा या राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होते आहे. या सर्व ठिकाणी भाजपची पिछेहाट होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी काय बोलणार, याची सर्वांना उत्सुकता होती. परंतु, मोदी यांनी निकालांविषयी कोणतेच भाष्य केले नाही. मात्र, एकूणच भाजपची पिछेहाट पाहता मोदींचा सूर काहीसा मवाळ दिसला.
यावेळी मोदी यांनी म्हटले की, संसदेचे हे अधिवेशन खूप महत्त्वाचे आहे. या अधिवेशनात जनहिताचे अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न मांडले जातील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे सगळ्यांनीच अधिक काळ काम करायची तयारी ठेवा. जेणेकरून महत्त्वपूर्ण कामकाज पूर्णत्वाला नेता येईल. सर्व राजकीय पक्षांनी याचे भान ठेवून संसदेच्या कामकाजाचा वापर जनहितासाठी होईल, याचे भान ठेवावे. त्यामुळे मला आशा आहे की, संसदेतील सर्व खासदार याचे भान ठेवून कामकाज करतील. प्रत्येक मुद्दयावर चर्चा व्हावी, हाच आमचा प्रयत्न असेल, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
दरम्यान, आज जाहीर होत असलेल्या निकालांमध्ये मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ या प्रमुख राज्यांमध्ये भाजपची स्पष्टपणे पिछेहाट होताना दिसत आहे. तर काँग्रेसने सर्व ठिकाणी जोरदार कमबॅक केले आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या तोंडावर हे निकाल काँग्रेस कार्यकर्त्यांचा हुरुप वाढवणार आहेत. तर दुसरीकडे या निकालांमुळे भाजपला आपल्या रणनीतीचा नव्याने विचार करावा लागणार आहे.