नवी दिल्ली : संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या तीन तलाक प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला. तीन तलाकवर आजपासून बंदी घालून, सरकारने सहा महिन्यात कायदा करावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिला आहे. या निर्णयानंतर देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विटरवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 'सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल ऐतिहासिक आहे. या निर्णयामुळे मुस्लीम महिलांना समानतेचा हक्क मिळेल तसेच महिला सबलीकरणासाठी हा निर्णय मापदंड ठरेल' असं मोदींनी म्हटलं.


तीन तलाक रद्द झाल्याने आता मुस्लीम महिलांसाठी नव्या युगाला सुरुवात झाली आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी दिली आहे. 'मुस्लीम महिलांसाठी स्वाभिमानपूर्ण आणि समानतेच्या नव्या युगाची सुरुवात म्हणून सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाकडे पाहिलं जाईल. हा निर्णय जय-पराजयाचा नाही तर मुस्लीम महिलांच्या समानतेचा अधिकार आणि मूलभूत संविधानाने दिलेल्या अधिकाराचा विजय आहे असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.