एनडीएच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह बिहारला जाणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा एनडीएला आणखी मजबूत करण्यासाठी बिहारला जाणार
पटना : बिहार विधानसभा निवडणूक २०२० साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा एनडीएला आणखी मजबूत करण्यासाठी बिहारला जाणार आहेत. राष्ट्रीय नेत्यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी बिहार एनडीएच्या नेत्यांनी नितीशकुमारांपेक्षा पंतप्रधान मोदी आणि अमित शहावर विश्वास ठेवला आहे. भाजपमधील विश्वासार्ह सूत्रांच्या माहितीनुसार, लवकरच हे शीर्ष नेते बिहारमध्ये एनडीएच्या प्रचारासाठी जाणार आहेत.
गेल्या काही दिवसात बिहारच्या राजकारणात बरेच बदल झाले आहेत. यावेळी जागांच्या दृष्टीने जेडीयूपेक्षा जास्त जागा जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, जेणेकरून आघाडीत त्याचे महत्त्व वाढेल. एलजेपीने एनडीएशी आपले संबंध तोडले, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींवर त्यांचा विश्वास असल्याचे दिसून येत आहे. एलजेपी नेतृत्वाचे म्हणणे आहे की पीएम मोदी आणि भाजपसोबत त्यांचा कोणताही वाद नाही. एलजेपीची लढाई फक्त जेडीयूशी आहे.
चिराग पासवान यांचा भाजपसह सरकार स्थापनेचा प्रयत्न
विशेष म्हणजे, निवडणुकांनंतर बिहारमध्ये एलजेपी आणि भाजप एकत्रित सरकार स्थापन करतील, असे चिराग पासवान अनेकदा सांगताना दिसतात. चिराग जसा विचार करतात तसा पंतप्रधान मोदीही विचार करतात का? या प्रकारचे प्रश्न सध्या बिहारच्या जनतेच्या मनात असतील. म्हणून सर्वांचे लक्ष पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या वक्तव्यांवर असेल.
बिहारमधील एनडीएचा चेहरा नितीशकुमार
बिहार निवडणुकीतील सर्वात महत्वाची बाब म्हणजे, लोजपा कार्यकर्ते 'मोदी से बार नहीं, नीतीश से खैर नहीं' अशी घोषणा देत असले तरी बिहारमधील एनडीएचे नेते मुख्यमंत्री नितीशकुमार हेच असल्याचे बिहार भाजपने स्पष्टपणे सांगितले आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी हे स्पष्ट केले आहे की, बिहारमध्ये भाजप आणि जेडीयूच्या कितीही जागा आल्या तरी मुख्यमंत्री नितीशकुमारच बनतील.