PM Modi Announcement About Sudha Murty: प्रसिद्ध लेखिका, ‘इन्फोसिस फाउंडेशन’च्या प्रमुख आणि आपल्या समाजकार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या सुधा मूर्तींवर केंद्रात सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने नवीन जबाबदारी सोपवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून यासंदर्भातील माहिती दिली आहे.


मोदींनीच केली घोषणा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान मोदींनी आपल्या एक्स (ट्वीटर) अकाऊंटवरुन एका सोहळ्यातील जुना फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ते सुधा मूर्ती यांना नमस्कार करताना दिसत आहेत. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदारांमध्ये सुधा मूर्तींच्या नावाचा समावेश असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. "भारताच्या राष्ट्रपतींनी राज्यसभेतील सदस्य म्हणून सुधा मूर्ती यांना नामांकित केल्याने मला आनंद होत आहे," असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.


नक्की वाचा >> महिला धोरण जाहीर! 'या' महिलांना मासिक पाळीच्या दिवसांत मिळणार भरपगारी सुट्टी


त्या मूर्तीमंत उदाहरण


"सामाजिक कार्य, समाजसेवा आणि शिक्षण यासहीत विविध क्षेत्रात सुधाजींचे योगदान फार मोठं आहे. त्याचं काम फारच प्रेरणादायी आहे. राज्यसभेतील त्यांची उपस्थिती ही आमच्या 'नारी शक्ती' धोरणाचा एक शक्तिशाली पुरावा आहे. ही (सुधा मूर्ती यांच्या रुपातील) नारी शक्ती आपल्या देशाचे नशीब घडवण्यात महिलांच्या सामर्थ्याचे आणि सन्मानाचे मूर्तीमंत उदाहरण देते. त्यांना फलदायी संसदीय कार्यकाळासाठी शुभेच्छा," असं म्हणत मोदींनी सुधा मूर्तींच्या कार्याचा गौरव करत त्यांना या नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्यात.



सोशल मीडियावरही प्रचंड लोकप्रिय


सोशल मीडियावरही सुधा मूर्तींचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये अनेकदा त्यांची वेगवेगळ्या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टीकोन इतरांपेक्षा कसा वेगळा आहे याची जाणीव होते. सुधा मूर्तींनी इन्फोसिसचे संस्थापक असलेले त्यांचे पती नारायण मूर्तींच्या मदतीने 1996 साली ‘इन्फोसिस फाउंडेशन’ची स्थापना केली. ही संस्था समाजिक क्षेत्रात मोलाचं काम करते.


आरोग्य, शिक्षण आणि मागलेल्या घटकांसाठी या संस्थेनं मागील 28 वर्षांमध्ये बरंच काम केलं आहे. सुधा मूर्तींना ही नवीन जबाबदारी दिल्याने अनेकांनी त्यांचं अभिनंदन करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आता राज्यसभेमध्ये सुधा मूर्ती खासदार म्हणून कशी कामगिरी करतात हे येणारा काळच सांगेल.