`कोरोनाशी लढण्यासाठी आर्थिक मदत द्या`, मोदींकडून आपत्कालिन फंडाची स्थापना
कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना आर्थिक मदतीचं आवाहन केलं आहे.
नवी दिल्ली : कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना आर्थिक मदतीचं आवाहन केलं आहे. तुमची मदत आरोग्यदायी भारताची निर्मिती करेल, असं मोदी म्हणाले आहेत. तसंच पंतप्रधानांनी पीएम केयर्स फंडचा अकाऊंट नंबरही जाहीर केला आहे.
'आरोग्यदायी भारताच्या निर्माणासाठी आपत्कालिन फंडाची स्थापना करण्यात आली आहे. जनता या फंडामध्ये जमेल तशी मदत करु शकते. नागरिकांनी पीएम केयर्स फंडासाठी मदत करावी. पीएम केयर्स फंड छोट्यात छोटी रक्कमही स्वीकार करतो. या फंडाचा आपत्कालिन व्यवस्था सक्षम करण्यासाठी नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी प्रोत्साहन देईल,' असं ट्विट मोदींनी केलं आहे.
या ट्विटसोबतच मोदींनी पीएम केयर्स फंडामध्ये पैसे देण्यासाठी अकाऊंट नंबर आणि इतर माहितीही ट्विटमध्ये जोडली आहे. भाजपचे सगळे खासदार कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकारला मदत म्हणून खासदार निधीतले १ कोटी रुपये देणार आहेत, अशी घोषणा भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या ट्विटला बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारने लगेचच प्रतिसाद दिला. अक्षय कुमारने पीएम केयर्स फंडाला २५ कोटी रुपयांची मदत केली आहे.
'या काळामध्ये आपल्या लोकांच्या जीवाचं महत्त्व सगळ्यात जास्त आहे. यासाठी आपल्याला सगळं काही केलं पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहायता निधीमध्ये मी २५ कोटी रुपये देत आहे. चला आयुष्य वाचवूया. जान है तो जहान है,' असं ट्विट अक्षय कुमारने केलं आहे.