PM Modi Pariksha Pe Charcha 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी आपल्या भाषणामध्ये आपण बेडवर गेल्यानंतर अवघ्या 30 सेकंदांमध्ये झोपी जातो असं म्हटलं आहे. विद्यार्थ्यांना स्क्रीन टाइममुळे झोपेत अडथळा निर्माण होत असल्याचं सांगताना त्याचे धोके सजावून सांगताना पंतप्रधानांनी हे विधान केलं. पंतप्रधान मोदी परीक्षा पे चर्चाच्या सातव्या पर्वानिमित्त विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधत होते. दिल्लीतील भारत मंडपम् येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पंतप्रधान मोदींनी स्क्रीन टाइम हा तुमच्या झोपेचा वेळ कमी करतो असं सर्वांच्या निदर्शनास आणून दिलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झोपेबद्दल काय म्हणाले पंतप्रधान?


"संतुलीत लाइफस्टाइल कायम सारखायची असेल तर कोणत्याही गोष्ट अती प्रमाणात होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. आरोग्यदायी शरीर हे आरोग्यदायी मनसाठी आवश्यक असतं. यासाठी दिनक्रम निश्चित करुन घेणं महत्त्वाचं ठरतं. सूर्यप्रकाशामध्ये वेळ घालवणं, नियमित आणि पूर्ण झोपं घेणं हा त्याचाच भाग आहे," असं पंतप्रधान मोदी म्हणाले. "झोपेचा महत्त्वाचा वेळ स्क्रीन टाइम खाऊन टाकते. मात्र पूर्ण झोप ही फार गरजेची असल्याचं सध्याचं आरोग्य विज्ञान सांगतं," असंही पंतप्रधानांनी आवर्जून सांगितलं.


दिलं स्वत:चं उदाहरण


झोपेचं महत्त्व पटवून देताना पंतप्रधानांनी स्वत:चं उदाहरण दिलं. "मी झोपयला जातो तेव्हा अवघ्या 30 सेकंदांमध्ये झोपी जातो. मी हे जाणीवपूर्वकपणे पाळलं आहे. जेव्हा झोपेतून उठता तेव्हा पूर्णपणे जागे असाल आणि झोपाल तेव्हा पूर्णपणे झोपेतच असाल याची काळजी घेतली तर झोपेतील संतुलन राखता येतं," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.


अधोरेखित केल्या 2 गोष्टी


पंतप्रधान मोदींनी यावेळेस परीक्षेची तयारी आणि अरोग्यदायी लाइफस्टाइल या दोघांमधील संतुलन राखण्यासंदर्भात राजस्थानमधील धीरज सुभाष नावाच्या विद्यार्थ्याने पंतप्रधानांना प्रश्न विचारला होता. तर कारगीलमधील निजाम खातून या विद्यार्थ्यांबरोबरच अरुणाचलमधील शिक्षक तोबी लेहम यांनीही पंतप्रधानांना अभ्यास आणि व्यायाम यांचं संतुलन कसं राखता येईल यासंदर्भात प्रश्न विचारले. यावर उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी संतुलित आहार आणि नियमीत व्यायाम या दोन गोष्टींची आवश्यकता अधोरेखित केली. तसेच त्यांनी तंदरुस्त राहण्यासाठी शारीरिक हलचाली आवश्यक असल्याचंही म्हटलं.


2 कोटींहून अधिक नोंदणी


शिक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या परीक्षा पे चर्चाचं हे सातवं वर्ष होतं. मागील सहा वर्षांपासून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांबरोबर पंतप्रधान मोदी या माध्यमातून संवाद साधत आहेत. कोरोनाच्या कालावधीमध्ये या कार्यक्रमाचं चौथं पर्व ऑनलाइन आयोजित करण्यात आलं होतं. त्यानंतर पाचवं आणि सहावं पर्व टाऊन हॉल फॉरमॅटमध्ये प्रत्यक्ष उपस्थितीत आयोजित करण्यात आलं होतं. मागील वर्षाच्या पर्वामध्ये 31.24 लाख विद्यार्थी, 5.60 लाख शिक्षक आणि 1.95 लाख पालकांनी मागील पर्वात सहभाग नोंदवला होता. यंदाच्या पर्वासाठी जवळपास 2.26 कोटी व्यक्तींनी माय जीओव्ही पोर्टलच्या माध्यमातून नोंदणी केली होती. प्रत्यक्षात या कार्यक्रमासाठी दिल्लीमध्ये प्रत्येक राज्यातील 2 विद्यार्थी आणि एक शिक्षिक सहभागी झाले होते.