चिनी ड्रॅगनला हद्दपार करण्यासाठी भारतीय खेळण्यांच्या उद्योगांवर सरकारचा भर
नवी रणनिती आखत सरकारनं तयार केला मास्टर प्लॅन
नवी दिल्ली : चीनी वस्तू हळूहळू भारतीय बाजारातून काढून टाकण्याच्या धोरणावर केंद्र सरकार सातत्याने काम करत आहे. चीनी मोबाईल ऍपवर कारवाई केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) भारतीय खेळण्यांच्या उद्योगाकडे (Toy Industry) लक्षकेंद्रीत करण्याकडे भर देण्याचं सांगितलं आहे.
पंतप्रधानांनी सांगितलं की, 'एक भारत, श्रेष्ठ भारत' (Ek Bharat, Shreshtha Bharat)ही भावना पुढे नेत, ती वाढवण्यासाठी खेळणी हे एक उत्तम माध्यम ठरु शकतं. भारतीय खेळण्यांच्या बाजारामध्ये मोठी क्षमता आहे आणि ते 'आत्मनिर्भर भारत' (AatmaNirbhar Bharat)अंतर्गत 'व्होकल फॉर लोकल'ला (Vocal for Local) प्रोत्साहन देऊन देशातील उद्योग क्षेत्रात मोठे बदल घडवून आणू शकतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, मंत्री आणि उच्च अधिकाऱ्यांना, भारतीय खेळण्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवून, लोकप्रिय करण्यासाठी पावलं उचलण्यास सांगितलं आहे.
भारतात खेळण्यांचे अनेक उद्योग समूह आहेत आणि हजारो कारागीर या कामाशी संबंधित आहेत. या उद्योगसमूहांना नाविन्यपूर्ण आणि सर्जनशील उपायांच्या माध्यमातून प्रोत्साहित केलं पाहिजे. भारतीय खेळण्यांच्या बाजाराच्या विस्तारास मोठा वाव आहे. आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देऊन या उद्योगात क्रांती होऊ शकते. खेळणी केवळ सांस्कृतिकदृष्ट्या मजबूत करत नाहीत तर खेळण्यांमुळे मुलांमध्ये मानसिक कौशल्यंही विकसित होत असल्याचं, पंतप्रधानांनी सांगितलं.
खेळण्यांचं महत्त्व सांगताना त्यांनी, भारतीय संस्कृती आणि मूल्यांशी संबंधित खेळणी अंगणवाडी केंद्र (Anganwadi Centres)तसंच शाळांमध्ये शैक्षणिक साधनं म्हणून वापरली पाहिजेत. त्याशिवाय मुलांमध्ये राष्ट्रीय कर्तृत्व आणि अभिमानाची भावना निर्माण करु शकतील अशा खेळण्यांच्या रचनांबद्दल तरुणांनीही विचार करायला हवा, अशी सूचनाही पंतप्रधानांनी केली आहे.