नवी दिल्ली : पंतप्रधानांचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन पायउतार होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी दिलीये. सुब्रमण्यन यांना कौटुंबिक कारणांमुळे अमेरिकेला परतावं लागणार असल्याचं जेटलींनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय. मात्र निवडणुकीला अवघं वर्ष शिल्लक असताना मुख्य आर्थिक सल्लागार राजीनामा देण्याच्या तयारीत असल्यानं याचा मोदी सरकारला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१६ ऑक्टोबर २०१४ रोजी सुब्रमण्यन यांची मुख्य आर्थिक सल्लागारपदी नियुक्ती झाली होती. गेल्यावर्षी त्यांना १ वर्षाची मुदतवाढ देण्यात आली. काही दिवसांपूर्वी आपली व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुब्रमण्यान यांच्याशी चर्चा झाली. यावेळी त्यांनी अमेरिकेला परत जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी दिलेली कारणं वैयक्तिक आणि त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यामुळे त्यांच्या निर्णयावर राजी होण्याखेरीज आपल्यासमोर पर्याय उरला नसल्याचं जेटलींनी लिहिलंय. सुब्रमण्यम यांच्या कामाचं कौतूक करून आपल्याला व्यक्तिगतरित्या त्यांची उणीव जाणवेल, असंही माजी अर्थमंत्री अरूण जेटलींनी म्हटलंय.