पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास मोदींकडून सैन्य दलांना पूर्ण मोकळीक - सूत्र
पाकिस्तानच्या एफ १६ जातीच्या विमानांनी बुधवारी दुपारी भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही संरक्षण दलांना पुढील कारवाई करण्यास मोकळीक दिली आहे.
नवी दिल्ली - पाकिस्तानच्या एफ १६ जातीच्या विमानांनी बुधवारी दुपारी भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही संरक्षण दलांना पुढील कारवाई करण्यास मोकळीक दिली आहे. सैन्य दलाच्या तिन्ही प्रमुखांसोबत नरेंद्र मोदी यांची बुधवारी बैठक झाली. त्यामध्ये पाकिस्तानला योग्य ते प्रत्युत्तर देण्यास सैन्याच्या तिन्ही दलांना पूर्णतः मोकळीक देण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला. भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानच्या विमानांना भारतीय हवाई दलाच्या विमानांनी लगेचच पिटाळून लावले होते. इतकेच नाही तर पाकिस्तानचे एफ १६ जातीचे एक विमान भारतीय विमानांनी पाडलेही होते. या कारवाईवेळी भारताचे मिग २१ जातीचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. या विमानातील वैमानिकाने वेळीच बाहेर उडी मारल्याने तो बचावला. पण तो पाकव्याप्त काश्मीरमध्ये उतरल्यानंतर त्याला पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतले.
पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या मिराज विमानांनी मंगळवारी पहाटे पाकव्याप्त काश्मीरमध्ये बालाकोटा येथील जैश ए मोहम्मद या दशतवादी संघटनेच्या तळांवर हल्ला केला. १२ मिराज विमानांनी ८० किलोमीटर आतमध्ये घुसून सुमारे १००० किलोचे बॉम्ब या तळांवर टाकले. या हल्ल्यात जैश ए मोहम्मदचे सुमारे ३५० दहशतवादी ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर डोंगराळ भागात असलेला हा संपूर्ण तळ उदध्वस्त करण्यात भारताला यश मिळाले. या हल्ल्यानंतर पाकिस्तानने बुधवारी जम्मू-काश्मीरमधील नौशेरा, राजौरीमध्ये आपली लढाई विमाने आणली होती. भारताला आधीपासूनच प्रत्युत्तराचा अंदाज असल्याने भारताच्या हवाई दलाच्या मिग २१ विमानांनी तातडीने कारवाई करीत या विमानांना आपल्या हवाई हद्दीतून पिटाळून लावले.
पाकिस्तानने थेट भारतीय हवाई हद्दीचा भंग करून अकारण भारतीय हद्दीत घुसखोरी केली. त्याचबरोबर भारतीय सुरक्षा दलांच्या तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. यामुळे पुन्हा एकदा दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या कोणत्याही कृतीला चोख प्रत्युत्तर देण्याची सूचना नरेंद्र मोदी यांनी तिन्ही सैन्य दलांना केली आहे.