Modi in Leh: वीरांनी शौर्य गाजवूनच आपल्या भूमीचे रक्षण करायचे असते- मोदी
विस्तारवादाचे युग संपले आहे, असे सांगत अप्रत्यक्षपणे चीनला इशारा दिला.
लेह: शांतता ही प्रगती आणि स्थैर्यासाठी गरजेची आहे. मात्र, दुबळेपणा हा शांतता आणू शकत नाही. त्यासाठी वीरतेचीच गरज असते. त्यामुळे वीरांनी शौर्य गाजवून आपल्या भूमीचे रक्षण करायचे असते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी लेहमध्ये भारत-चीन सीमेवरील सैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विस्तारवादाचे युग संपले आहे, असे सांगत अप्रत्यक्षपणे चीनला इशारा दिला. संपूर्ण जग हे विस्तारवादाच्या विरोधात आहे. सध्याचे युग हे विकासाचे युग असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
धक्कांतत्र... पंतप्रधान मोदी पोहोचले लेहमध्ये
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी भारतीय सैनिकांचे कौतुक केले. तुम्ही आज ज्या उंचीवर तैनात आहात त्यापेक्षा कितीतरी अधिक तुमच्या शौर्याची उंची आहे. तुमच्या शौर्यामुळे आज देशातील नागरिकांची छाती अभिमानाने फुलली आहे. तसेच त्यांचे मस्तक आदराने तुमच्यापुढे झुकल्याचे मोदींनी सांगितले.
आजपर्यंत आपण एकत्र मिळून प्रत्येक कठीण आव्हान परतवून लावले. यापुढेही आपण मिळून प्रत्येक संकटावर विजय मिळवत राहू, असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. आपल्या संपूर्ण भाषणात पंतप्रधान मोदी यांनी चीनचा थेटपणे उल्लेख केला नाही. मात्र, सरकारने भारत-चीन सीमेवरील खर्चात तीन पट वाढ केली आहे. त्यामुळे शस्त्रास्त्र आणि सैनिकांना लागणारी सामुग्री उपलब्ध होईल, असे सांगत नरेंद्र मोदी यांनी आपले मनसुबे स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सकाळी अनपेक्षितपणे लेहमध्ये दाखल झाले. याठिकाणी आल्यानंतर त्यांनी लष्करी तळावरील जवानांशी संवाद साधला. तसेच पूर्व लडाखमधील परिस्थितीचा आढावा घेतला.
गलवान खोऱ्यात १४ जूनच्या रात्री भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली होती. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले होते. यानंतर भारत आणि चीनमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. दोन्ही बाजूच्या सैन्याधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत हा प्रश्न सामोपचाराने सोडवायच्या, असे ठरले असले तरी भारत आणि चीनकडून लडाखमधील सैन्याची संख्या वाढवण्यात आली आहे. तसेच दोन्ही देशांकडून सीमाभागात मोठ्याप्रमाणावर युद्धसामुग्री तैनात केली जात आहे.