नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला जोरदार उत्तर दिलं आहे. पीओकेमध्ये घुसून भारताने पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक केला आहे. पण यंदाचा हा सर्जिकल स्ट्राईक हा हवेतून करण्यात आला आहे. वायुदलाच्या मिराज 2000 या लढाऊ विमानांनी मंगळवारी पहाटे 3.30 वाजता बालाकोट आणि मुजफ्फराबादच्या सीमाभागात दहशतवाद्यांच्या ठिकाणांना उद्धवस्त केलं आहे. यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजीत डोवाल यांनी पंतप्रधान मोदींना या कारवाईची संपूर्ण माहिती दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय वायुदलाने जवळपास 3 वाजता 12 मिराड विमानांनी ही स्ट्राईक केली. या स्ट्राईकमध्ये जैशचे अनेक कॅम्प उध्वस्त करण्यात आले आहेत. जैशचं कंट्रोल रूम अल्फा-3 देखील पूर्णपणे नष्ट करण्यात आलं आहे. भारतीय वायुदल आणि संरक्षण मंत्रालय दुपारी याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहेत अशी माहिती समोर येते आहे. 


गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या कार्रवाईबाबत बैठकीत चर्चा झाली. यापुढे काय कारवाई करावी आणि रणनिती आखावी याबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती कळते आहे. या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. इस्लामाबादमध्ये पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने तातडीची बैठक बोलावली आहे.


पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला होता की याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. भारतीय जवान याचं उत्तर देतील. मोदींच्या या इशाऱ्य़ानंतर पाकिस्तानी लष्कर देखील घाबरलं होतं. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची शांतीची एक संधी द्यावी अशी मागणी केली होती. पण पाकिस्तान सुधरण्याच्या स्थितीत दिसत नव्हतं. कारण पुलवामा हल्ल्यानंतर देखील पाकिस्तानी लष्कराकडून फायरिंग केली जात होती.


वायुदलाच्या या कारवाईनंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत, भारतीय वायुदलाचं कौतुक केलं आहे. त्यांनी म्हटलं की, 'भारतीय वायुदलाच्या जवानांना सलाम.' जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अबदुल्ला यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी वायुदलाचं अभिनंदन केलं आहे.


पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. भारताने यानंतर पाकिस्तानला कडक शब्दात इशारा दिला होता.