...जेव्हा पंतप्रधान मोदी ताफा थांबवून जुन्या मित्राला भेटतात!
पंतप्रधान नरेंद्र मोदी महिन्याभरात तिसऱ्यांदा शनिवारी दोन दिवसांसाठी गुजरात दौऱ्यावर गेले.
अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी महिन्याभरात तिसऱ्यांदा शनिवारी दोन दिवसांसाठी गुजरात दौऱ्यावर गेले. दौऱ्याची सुरुवात द्वारकेतून केली. द्वारकाधीश मंदिरातून पंतप्रधान मोदी बाहेर पडल्यानंतर एक खास घटना घडली. ती म्हणजे मंदिरातून बाहेर पडल्यानंतर मोदींना आपला एक जुना मित्र दिसला. यावेळी मोदींनी ताफा थांबवून आपल्या जुन्या मित्राची भेट घेतली.
हरिभाई असे पंतप्रधानांच्या मित्राचे नाव असून ते त्यांचे जुने मित्र आहेत. ते ५२ वर्ष संघाशी संलग्न आहेत. मोदींसोबत देखील त्यांचे चांगले संबंध आहेत. भेटीनंतर हरिभाई यांनी मोदींना गुलाबाचे फुल दिले. संघाचे काम करताना हरिभाई आणि मोदी एकाच खोलीत राहत होते. शनिवारी त्यांच्या भेटीचे काही फोटो समोर आले. त्यात पंतप्रधान फार आपुलकीने त्यांच्या जुन्या मित्राला भेटताना दिसत आहेत. यावर हरिभाई यांनी सांगितले की, "अलीकडेच माझ्या पत्नीचे देहांत झाल्याचे पंतप्रधान मोदींना माहित होते. त्याबद्दल मोदींनी आपल्या भावना देखील व्यक्त केल्या."
पंतप्रधानांनी ओखा आणि द्वारकाच्या मधल्या पुलाचे भूमिपूजन केले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते. यापूर्वी सकाळी सुमारे १०:४५ ला पंतप्रधानांनी द्वारकाधीश मंदिरात विधिवत पूजाअर्चा केली. १० मिनिटे ही पूजा चालली. चरण पादुका पूजेनंतर पंतप्रधानांनी देवाच्या भव्य मूर्तीचे दर्शन घेतले. फळे इत्यादी भगवंताला अर्पण केले.
त्यानंतर मंदिर परिसरातील लोकांशी मोदींनी बातचीत केली. त्यावेळी गुजरातचे पंतप्रधान विजय रुपानी देखील त्यांच्यासोबत होते.
पश्चिम गुजरातमधील हे मंदिर २५०० वर्ष जुने आहे. मथुरा सोडल्यानंतर भगवान कृष्ण याचठिकाणी राहत होते, अशी श्रद्धा आहे. द्वारकेमध्ये पंतप्रधान एका सभेचे आयोजन करतील. यावर्षी गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
पंतप्रधानांनी पूर्वीच ट्विट करून आपल्या दौऱ्याची माहिती दिली. त्यात त्यांनी लिहिले, "मी आज आणि उद्या गुजरातमध्ये असेन. राज्यातील सगळ्या महत्त्वाच्या कर्यक्रमांत सहभागी होईन." त्याचबरोबर द्वारकाधीश मंदिरात दर्शन करून झाल्यावर शनिवारच्या कार्यक्रमांना सुरुवात होईल.