नवी दिल्ली : अयोध्या वादग्रस्त जमिनीचा निकाल १७ नोव्हेंबरपर्यंत लागण्याची शक्यता आहे. मात्र या निकालाबाबत कोणत्याही केंद्रीय मंत्र्याने विनाकारण विधानं करू नयेत असे आदेश पंतप्रधान मोदींनी दिले आहेत. देशात शांततेचं वातावरण कायम ठेवण्याचं आवाहन यावेळी मोदींनी केलं आहे. सुप्रीम कोर्टाकडे भारतातील जनतेचं लक्ष लागलं आहे. या प्रकरणात सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याबाबत उत्सुकता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील सर्वात अतिसंवेदनशील असं हे प्रकरण आहे. राम जन्मभूमी आणि बाबरी मशीदीचा हा वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. गेल्या ४० दिवसात या प्रकरणात जलद सुनावणी झाली. १६ ऑक्टोबरला या प्रकरणाचा निकाल सुरक्षित ठेवण्यात आला आहे. आता यावर काय निर्णय येणार याबाबत देशभरातील जनतेचं लक्ष लागून आहे. मुख्य न्यायधीश रंजन गोगोई निवृत्त होण्याआधी जर या प्रकरणात निकाल देतील तर गेल्या ३० वर्षांपासून प्रलंबित हे प्रकरण बंद होईल. जर तसं नाही झालं तर पुन्हा नवीन न्यायाधीश आल्यानंतर सुनावणी होईल. 


देशातील विविध मुस्लीम तसेच हिंदू संघटनांकडून सुप्रीम कोर्टाचा निर्णय जो येईल त्याचं स्वागत करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. ठीकठिकाणी बैठका घेऊन संघटनांच्या प्रमुखांना शांतता ठेवण्याचं आवाहन करण्यात येत आहे. 


याआधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) देखील सुप्रीम कोर्टाचा जो ही निर्णय येईल त्याचं खुल्या मनानं स्वागत करण्याचं आवाहन केलं  होतं. लवकरच अयोध्या प्रकरणात निर्णय़ येण्याची शक्यता आहे.