पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिला फिलिप कोटलर पुरस्कार
उत्कृष्ट नेतृत्व प्रदान करण्यासाठी सन्मान
नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फिलिप कोटलर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. नरेंद्र मोदी यांचा हा सन्मान देशात उत्कृष्ट नेतृत्व प्रदान करण्यासाठी करण्यात आला. अमेरिकेच्या इमोरी यूनीवर्सिटीचे प्रोफेसर डॉक्टर जगदीश सेठ यांनी दिल्लीत हा पुरस्कार पंतप्रधान मोदींना दिला. दरवर्षी हा पुरस्कार कोणत्याही देशातील नेत्याला त्याच्या उत्कृष्ट योगदानासाठी दिला जातो.
नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेल्या या प्रशस्तीपत्रात म्हटलं आहे की, 'भारतीय पंतप्रधानांनी देशाची निःस्वार्थ भावाने जी सेवा केली आहे त्यामुळे देशाचा आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रात शानदार विकास झाला आहे. मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडियावर आधारीत योजनांमुळे नव्या उत्पादकांना प्रोत्साहन मिळालं. या योजनेमुळे भारताची ओळख औद्यागिक लेखा आणि वित्त सेवांचं केंद्र म्हणून तयार झाली आहे.'
फिलिप कोटलर हे प्रसिद्ध मार्केटिंग गुरू आहेत. सध्या अमेरिकेत नॉर्थवेस्टर्न यूनिवर्सिटीच्या केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये ते मार्केटिंगचे प्रोफेसर आहेत. आपल्या आजारपणामुळे त्यांनी डॉक्टर जगदीश सेठ यांना पंतप्रधान मोदी यांना पुरस्कार देण्यासाठी पाठवलं.