नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री ८.०० वाजता देशाला संबोधित केलं. त्यांचं हे संबोधन संपूर्णत: जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या जनतेला समर्पित होतं. अनुच्छेद ३७० आणि ३५ ए रद्द करण्यात आल्यानंतर पंतप्रधान मोदी देशाला पहिल्यांदाच संबोधित करत होते. जम्मू-काश्मीरचा राज्याचा दर्जा काढून केंद्रशासित प्रदेश करण्याच आपला निर्णय हा जम्मू-काश्मीरच्या जनतेसाठी फायद्याचाच ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी जनतेला देण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील शहिदांचाही खास उल्लेख केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज या निमित्तानं मी जम्मू-काश्मीरच्या जनतेच्या सुरक्षेमध्ये तैनात असणाऱ्या आपल्या सुरक्षा दलातील सहकाऱ्यांचेही आभार व्यक्त करू इच्छितो. प्रशासनाशी निगडीत सर्व लोक, राज्याचे कर्मचारी आणि जम्मू-काश्मीरचे पोलीस यांनी ज्या पद्धतीनं ही स्थिती हाताळली त्यामुळे ते प्रशंसेचे पात्र आहेत. तुमच्या परिश्रमामुळेच बदल होऊ शकतो, या माझ्या विश्वासात आणखीन वाढ झालीय. 


जम्मू काश्मीर आपल्या देशाचा मुकूट आहे. जम्मू काश्मीरसाठी अनेक वीर तरुण-तरुणींनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. पुँछ जिल्ह्याचे मौलवी गुलाम, ज्यांनी ६५ च्या लढाईत पाकिस्तानी घुसखोरांबद्दल भारतीय सेनेला माहिती दिली. त्यांना अशोकचक्रानं सन्मानित करण्यात आलं. 


लडाखचे कर्नल सोनम ज्यांनी कारगिल युद्धात शत्रूला धूळ चारली. त्यांनाही महावीर चक्र देण्यात आलं. 


राजौरीची रुखसाना कौसर, ज्यांनी मोठ्या दहशतवाद्यांना ठार केलं. त्यांनाही कीर्ति चक्रानं सन्मानित करण्यात आलं. 


कौंचचे शहीद औरंगजेब ज्यांची गेल्या वर्षी दहशतवाद्यांनी क्रूर हत्या केली होती आणि त्यांचेच दोन भाऊ सध्या सेनेत भर्ती होऊन देशाची सेवा करत आहेत, अशा वीर तरुण-तरुणींची यादी खूप मोठी आहे. 



दहशतवाद्यांशी लढताना जम्मू-काश्मीर पोलिसातील अनेक अधिकारी शहीद झाले. निर्दोष नागरिकही मारले गेले. जम्मू काश्मीरला शांत, सुरक्षित, समृद्ध बनवण्याचं स्वप्न या सर्वांनी पाहिलं होतं. आपल्याला ते स्वप्न एकत्र येऊन पूर्ण करायचंय. हा निर्णय जम्मू-काश्मीर आणि लडाखसोबतच संपूर्ण भारताच्या आर्थिक प्रगतीत सहकार्य करेल, असंही पंतप्रधान नरेंद्र मोंदींनी आपल्या भाषणात म्हटलंय.